उद्धव ठाकरेंनी साधला वैशाली येडे यांच्याशी संवाद

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – आत्महत्याग्रस्त शेतकरी सुधाकर येडे यांच्या पत्नी वैशाली येडे यांच्या हस्ते ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पार पडले. यात त्यांनी आपले मत व्यक्त करताना त्यांनी कविता सादर केली. यात त्यांनी शेतकऱ्याचे विदारक सत्य त्यांनी मांडले. यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. शेतकरी विधवांचे प्रश्न, विदारक स्थिती साहित्याच्या व्यासपीठावरून निर्भीडपणे मांडल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी येडे यांचे अभिनंदन केले. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी हा संवाद घडवून आणला आहे.

शुक्रवारी दुपारी हे साहित्य संमेलनाचे उद्घाटन पार पडले. यावेळी वैशाली येडे यांनी कविता सादर केली. यातून वैशाली येडे यांनी शेतकऱ्यांच्या विधवा महिलांचे प्रश्न रोखठोकपणे मांडले. त्यांच्या भाषणातील या कवितेचे सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसून आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही वैशाली येडे यांचे भाषण ऐकले आणि यानंतर फोनवरून त्यांचे अभिनंदन केले.

येडे यांचे भाषण ऐकल्यानतंर आज सकाळी उद्धव ठाकरे यांनी ना. संजय राठोड यांच्या मार्फत वैशाली येडे यांच्याशी संवाद साधला. यावेळी वैशाली येडे यांच्याशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील तुमच्यासारखी भगिनी ही आदिशक्तीचे रूप आहे. संसार मोडून पडल्यानंतरही ज्या खंबीरपणे तुम्ही कुटुंब सावरून, आपली व्यथा समाजासमोर आणली, ती वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. हा संघर्ष समाजासोबतच साहित्यिकांनाही प्रेरणादायी आहे. तुम्ही एकट्या नसून शिवसेना तुमच्या सारख्या भगिनींच्या पाठीशी सदैव आहे. कोणतीही मदत लागली तर संजय राठोड यांच्यामार्फत कळवा.

“इतकेच नाही तर, ना. संजय राठोड यांनी वैशाली येडे यांचे अभिनंदन करून एक भाऊ म्हणून आपण सदैव सोबत आहो, असे सांगितले. यानंतर वैशाली येडे यांनी आपली व्यथा ना.संजय राठोड यांच्यासमोर मांडली. तेव्हा त्यांना सर्वतोपरी मदत करून त्यांच्या अडचणी सोडवण्याचा विश्वास ना. राठोड यांनी त्यांना दिला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, मोहन नंदूरकर आदी उपस्थित होते.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक नयनतारा सहगल यांच्या निमंत्रणावरून वाद उद्भवल्यानंतर संमेलनाच्या उद्घाटनासाठी कोणीही पुढे येईना, तेव्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलेच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्याचे ठरविण्यात आले.  त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील राजूर येथील वैशाली येडे यांना हा सन्मान देण्यात आला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us