रावणाच्या लंकेत घडले ; रामाच्या अयोध्येत कधी घडणार ? ‘बुरखा’, ‘नकाब’ वर बंदी घाला : उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटानंतर श्रीलंका सरकराने खबरदारी म्हणून बुरखा किंवा नाकाब परिधान करण्यावर बंदी घातली आहे. त्याच पार्श्वभूमीवर रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार ? असा सवाल करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ तील अग्रलेखामधून बुरख्यावर बंदी घालण्याची मागणी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या दौऱ्यावर आहेत. म्हणूनच उद्धव ठाकरेंनी मोदींना आपल्या अग्रलेखातून हा सवाल केला आहे.

भारतात ‘बुरखा’, ‘नकाब’ ला बंदी करावी
त्यांनी पुढे आपल्या अग्रलेखात म्हंटले आहे की, “हिंदुस्थान, विशेषतः हिंदुस्थानचा जम्मू आणि कश्मीर प्रांत त्याच इस्लामी दहशतवादाने त्रस्त आणि जर्जर झाला आहे. प्रश्न इतकाच आहे की, श्रीलंका, फ्रान्स, न्यूझीलंड आणि ब्रिटनसारखी राष्ट्रे जी कठोर पावले उचलतात तशी पावले आपण कधी उचलणार ? विद्यमान सरकारने ‘ट्रिपल तलाक’ विरोधात कायदा करून पीडित मुस्लिम महिलांचे शोषण वगैरे थांबवले हे मान्य, पण भीषण बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकेत बुरखा आणि नकाबसह चेहरा झाकणार्‍या प्रत्येक गोष्टीवर बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला असल्याचे राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी जाहीर केले. आम्ही या निर्णयाचे स्वागत करीत आहोत व पंतप्रधान मोदी यांनीही श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून हिंदुस्थानातही ‘बुरखा’ तसेच ‘नकाब’ बंदी करावी, अशी मागणी राष्ट्रहितासाठी करीत आहोत”. असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे.

मोदींनी हे सर्व करून घेतले पाहिजे
भारतातील मुस्लीम समाजावर भाष्य करताना उद्धव यांनी ‘राष्ट्र नंतर, आधी धर्म’ हा मुसलमान समाजाचा प्राधान्यक्रम असल्याचे म्हटले आहे. इस्लाम धर्म देखील फालतू रूढी-परंपरांच्या बेड्यात अडकलेला आहे. असे सांगत मुसलमानांत कोणी फुले, शाहू निर्माण झाले नाहीत. किंबहुना होऊ दिले गेले नाहीत असेही उद्धव यांनी अग्रलेखात म्हटले आहे. याच कारणांमुळे शहाबुद्दीन, आझम खान, ओवेसी बंधू व अबू आझमी यांचे फावले असल्याचे उद्धव यांनी म्हटले आहे. उद्धव यांनी अग्रलेखात या नेत्यांचा ‘धर्मांध’, ‘माथेफिरू’ असा उल्लेख केला आहे. ‘ही धर्मांधता व त्यांच्यातील रूढी, परंपरा राष्ट्रीय सुरक्षेच्या आड येत असतील तर त्या मोडून काढल्या पाहिजेत. मोदी यांनी हे सर्व करून घेतले पाहिजे’, असे आवाहन त्यांनी पंतप्रधानांना केले आहे. सर्जिकल स्ट्राइकइतकेच हे कार्य धाडसाचे असल्याचेही ते म्हणाले.

You might also like