सेना शहरप्रमुखाचा पालिका मुख्यधिकाऱ्याच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न

कुरुंदवाड : पोलीसनामा ऑनलाईन – रखडलेल्या नळ पाणीपुरवठा योजने प्रश्नासंबंधी शिवसेनेकडून कुरुंदवाड पालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पालिकेच्या मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्या दालनात नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्या समोर शहरप्रमुख राजू आवळे यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी आवळे यांना ताब्यात घेतले.

कुरुंदवाड शहराच्या पाणीपुरवठा योजनेचे काम रखडले प्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख राजू आवळे अप्पासाहेब भोसले राजेंद्र बेले संतोष नरके अफजल महात यांनी जोरदार घोषणाबाजी करत, पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात प्रवेश केला. नगराध्यक्ष जयराम पाटील व नगरसेवक यांच्याकडे पाणी योजनेचे काम होत नसल्याची तक्रार त्यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा देत राजीनाम्‍याची मागणी केली. यावेळी शहर प्रमुख राजू आवळे यांनी मुख्याधिकारी मुतकेकर, नगराध्यक्ष पाटील यांच्यासमोरच रॉकेलचा कॅन काढून अंगावर ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्‍थितांनी त्‍यांना रोखले असता, दालनात मोठा गोंधळ निर्माण झाला.