मराठवाड्याच्या राजधानीत शिवसेनेच्या नगरसेवकाचा ‘कोरोना’मुळे मृत्यू

औरंगाबाद :पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुंबई, पुण्याप्रमाणे औरंगाबाद शहरातही कोरोना वेगाने पसरत आहे. या दरम्यान शहरातील  शिवसेनेचे नगरसेवक नितीन साळवे यांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शहरातील बालाजी नगर वॉर्डातून ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

अनेक दिवसांपासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, ज्यामुळे प्रशासनासमोर नवं आव्हान निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी अनेक भागात निर्बंध लागू करण्यात आले. औरंगाबाद महानगर पालिकेचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शहरात कडक संचारबंदी लागू करण्याची गरज असल्याचं म्हंटल आहे.

दुसरीकडे, कोरोना बाधितांच्या संख्येत एकट्या मुंबईने आता चीनला देखील मागे टाकलं आहे. चीनमध्ये एकूण 85 हजार 320 कोरोना संक्रमितांची नोंद आहे, तर एकट्या मुंबईत हा आकडा पार करत रुग्णांची संख्या 85 हजार 724 वर पोहोचली आहे. तसेच मृत्यूच्या बाबतीतही चीनमध्ये 4 हजार 648 लोकांचा मृत्यू झाला होता, तर मुंबईमध्ये ही संख्या 4938 इतकी प्रचंड आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी चीनने कोरोनामुक्त होण्याचा दावा केला होता. चीनमध्ये सध्या केवळ 500 ते 600 सक्रिय रुग्ण असल्याचं समजते. त्याचवेळी राजधानी मुंबईत मात्र 23 हजार 624  सक्रिय रुग्ण आहेत.