नोटाबंदी झटका नव्हता, जनतेसाठी फाशीचा खटका : शिवसेना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेकडून भाजपवर करण्यात येणाऱ्या टीकेची धार दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसत आहे. काल काँग्रेसची बाजू घेत राफेल घोटाळ्यावरून भाजपला लक्ष्य करणाऱ्या शिवसेनेने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीवरून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मुलाखतीचे वादळ हे चहाच्या पेल्यातलेच ठरले असून पंतप्रधान हे बचावात्मक पवित्र्यात दिसले २०१९ची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर, अंगप्रदर्शनात स्पष्टपणे दिसत होती. मुलाखत गाजेल असे वाटत होते, पण तसे झाले नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे. नोटाबंदी हा झटका नव्हता, तर जनतेसाठी फाशीचा खटका होता, अशी टीकाही शिवसेनेने केली आहे. सामना या आपल्या मुखपत्रातून शिवसेनेने भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, मोदी यांनी एक पत्रकार परिषद घ्यावी व प्रश्नोत्तरे करावीत अशी मागणी होती. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी एकाच वाहिनीस मुलाखत देऊन ती प्रसारित केली. या मुलाखतीतून राममंदिर, नोटाबंदी, उद्याच्या सार्वत्रिक निवडणुका वगैरे विषयांवर ते बोलले, पण जनतेच्या मनातील प्रश्नांना उत्तरे मिळाली नाहीत. राम मंदिराबाबत मोदी पहिल्यांदा खरे बोलले. राममंदिर हा त्यांच्यासाठी अग्रक्रमाचा विषय नाही. रामाच्या नावावर सत्ता मिळाली व कायद्याचे राज्य त्यांच्या हाती आले तरी श्रीराम हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत हे त्यांनी सांगितले.

शीख हत्याकांडाबद्दल ज्याप्रमाणे काँग्रेसला माफी मागावी लागली तसे हिंदू नरसंहाराबद्दल माफी मागा असे कोणी म्हणाले तर त्यांच्याही भावना समजून घ्या, असेही शिवसेनेने म्हटले आहे. राममंदिर व पाकिस्तान या दोन प्रमुख विषयांमुळे भाजपाला सत्ता मिळाली आणि मोदी पंतप्रधान बनले, पण जनतेच्या हाती धुपाटणेच आले. पुढील निवडणूक जनता विरुद्ध महाआघाडी असा नारा मोदी यांनी दिला आहे. मग २०१४ साली त्यांना पाकिस्तान, इराणच्या जनतेने मतदान केले होते काय? पाच राज्यांत भाजपचा पराभव करणारा मतदारही या देशाची जनता नव्हती काय?, असे प्रश्न सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आले आहेत.