‘भाजपनं ‘पावर’गेम करत विरोधी पक्ष खरेदी-विक्री संघ उघडला होता’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपाने आपल्या सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षाचा खरेदी-विक्री संघ उघडला असल्याचा टोला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ मधून लगावण्यात आलेला आहे. त्यांनी उघडलेल्या संघाच्या मार्गाने तरी मुख्यमंत्री आणि महाविकासआघाडी जाताना दिसत नाही. आम्ही जर विरोधी बाकांवरील १०५ लोकांशी बोलायचे ठरवले तर विरोधी पक्षनेत्यांचे काय होईल ? असाही टोला सामना कडून लगावण्यात आलेला आहे.

नागपूरमधील एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी देवेंद्र फडणवीस हे फार काळ विरोधी पक्षनेते म्हणून राहणार नाहीत, ते फार वेळ माजी मुख्यमंत्री म्हणूनही राहणार नाही असे वक्तव्य केले होते. त्यामुळे विरोधी पक्षाचा आत्मविश्वास वाढला असेलही, पण आता महाराष्ट्रात असे काही होणार नाही. देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्ष नेते म्हणून कामाला सुरुवात करावी अशी कोपरखळी शिवसेनेने मारली आहे.

सामना अग्रलेखातील ठळक मुद्दे

१ – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्षाची विधीमंडळ अधिवेशनातील भूमिका काय असणार आहे हे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या चहापानावर बहिष्कार टाकून सांगितले आहेच.

२ – महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. चहापानावर बहिष्कार टाकून विरोधी पक्षाने आडमुठे धोरण स्वीकारलेले आहे. चहापानाला येऊन शेतकरी, कष्टकरी तसेच इतर समस्यांवर मुख्यमंत्र्यांशी बोलायला काहीच हरकत नव्हती.

– लोकशाही व्यवस्थेत मजबूत विरोधी पक्ष असणे खूप आवश्यक असते. संसदीय लोकशाहीच्या परंपरा राखून विरोधी पक्ष नेत्याने कार्य करायला हवे, परंतु देवेंद्र फडणवीस या कार्यात अपयशी झाले आहेत. लोकं जेवढे सरकरकडे मदत मागायला येतात, तेवढेच ते दाद मागण्यासाठी विरोधी पक्ष नेत्याकडे सुद्धा जात असतात.

४ – राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. आमच्यात योग्य तो सुसंवाद सुरु आहे तो कोणत्याही परिस्थितीत तुटणार नाही. तिन्ही पक्ष हे सरकार ५ वर्षे चालवायचे या भूमिकेवर ठाम आहेत. पण आमची हीच एकता विरोधी पक्षाला त्रासदायक ठरते आहे.

५ – हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाला २५ वर्षे साथ देणाऱ्या शिवसेनेशी तुमचा संवाद तुटतो कसा याचे उत्तर भाजपने महाराष्ट्राला दिले पाहिजे. तीन विभिन्न विचारांचे पक्ष एकत्र आले हा देखील एक संवादच आहे.

६ – संवाद कौशल्याचे धडे फडणवीसांनी महाविकासआघाडीला शिकवू नयेत. रामभाऊ म्हाळगी यांच्या संस्थेत संवाद कौशल्याचे धडे भाजपच्या नेत्यांनी घ्यावेत.

– विधिमंडळात विरोधी पक्षाने सरकारला कामच करून देणार नाही अशी भूमिका फडणवीसांनी घेतली आहे, त्यामुळे हाच त्यांचा संवाद असेल तर, देव त्यांचे रक्षण करुदेत असेही शिवसेनेने म्हटले आहे.

८ – देवेंद्र फडणवीस हे दोन वेळेस राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. एकदा पूर्ण पाच वर्षे आणि दुसऱ्यांदा ८० तास. पाच वर्षांपेक्षा हे ८० तास खूप महत्वाचे होते, कारण ८० तासांत राष्ट्रपती भवन, राजभवन, गृहमंत्रालय, ईडी, सीबीआय कडे संपर्क करूनसुद्धा आमच्या महाविकास आघाडीतील एकही आमदार फुटला नाही, त्यामुळे आमच्यातील एकता अबाधित आहे.

९ – भाजपचे १०५ आमदार आहेत, बाकी कोणीही त्यांच्या सोबत दिसत नाही. त्यांच्या १०५ मधील ५० आमदार तर, विरोधी पक्षात काम न करण्याच्या भूमिकेत आहेत.