भाजपचे ‘उपरे’ पुढारी परस्पर रेमडेसिवीरचा साठा विकत घेतायत, शिवसेना भडकली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसने राज्यासह देशात हाहाकार माजवला आहे. त्यातच ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शन तुटवडा निर्माण झाला आहे. यावरुन केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष निर्माण झाला आहे. आरोग्य सुविधांवरुन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. अशातच आता शिवसेनेनं राज्यातील भाजप नेते आणि केंद्रात मंत्री असणाऱे महाराष्ट्रातील नेते तसंच मोदी सरकार यांच्यावर गंभीर आरोप करत टीकेचे बाण सोडले आहेत.

शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपच्या राज्यातील आणि केंद्रातील नेत्यांवर निशाणा साधला आहे. प्राणवायूचे राजकारण झाले तसे रेमडेसिवीरचे सुरु आहे. महाराष्ट्र सरकारला हे इंजेक्शन हवे, ते त्यांना मिळत नाही, पण महाराष्ट्रातील भाजपचे उपरे पुढारी त्या औषध कंपन्यांकडून परस्पर रेमडेसिवीरचा साठा विकत घेतात, त्या कंपन्या हा साठा त्यांना परस्पर उपलब्ध करुन देतात हा अपराधच आहे. मात्र, ही साठेबाजी व काळाबाजारी कृत्ये पोलिसांनी उघड करताच भाजपचे लोक कढईतल्या गरम वड्यासारखे उकळून फुटू लागले. राज्यातील दोन्ही विरोधी पक्षनेते एका फार्मा कंपनीच्या मालकाला सोडवण्यासाठी रात्री पोलिस ठाण्यात धाव घेतात, याला काय म्हणायचे ? असा सवाल करत शिवसेनेने भाजप नेत्यांवर हल्ला चढवला आहे.

भाजपला आग्यावेताळ होण्याची गरज नाही

महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा पुरवठा करु नका म्हणून केंद्राने साठा असलेल्या कंपन्यावर दबाव आणल्याचा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, असे त्या कंपन्यांना केंद्राचे आदेश असतील तर नवाब मलिक यांनी जे सत्य समोर आणले, त्यामुळे विरोधी पक्षाला आग्यावेताळ होण्याचे कारण नाही. परिस्थिती अशी आहे की, एकमेकांवर खापर फोडण्यापेक्षा एकमेकांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील परिस्थिती हाताळली पाहिजे, पण विरोधी पक्षाचा अजेंडा सोपा आहे.

मलिकांचे वक्तव्य म्हणजे हवेतील बाण नाहीत

महाराष्ट्रातील सरकार कोरोनाशी लढण्यात अपयशी ठरावे यासाठी केंद्राच्या मदतीने त्यांचे सतत प्रयत्न सुरु आहेत. सरकराला ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा पुरवठा करता येत नाही, पण भाजप विरोधी पक्षांत असूनही लोकांना प्राणवायू व रेमडेसिवीर देऊ शकते हे सिद्ध करण्यासाठी 16 रेमडेसिवीर कंपन्यांवर दबाव आणल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. देशभरातील 16 निर्यातदारांकडे 20 लाख रेमडेसिवीर इंजेक्शन पडून आहेत. मात्र राज्याला गरज असताना ती विकण्यास कंपन्यांना परवानगी दिली जात नाही. महाराष्ट्र सरकारने औषध कंपन्यांशी संपर्क साधला तर त्यांना ते पुरवायचे नाही, महाराष्ट्राला हे औषध दिले तर कंपन्यांवर कारवाई करु अशा धमक्या दिल्याचे मलिक यांचे वक्तव्य धक्कादायक तेवढेच खळबळजनक आहे. नवाब मलिक हे एक जबाबदार मंत्री आहेत व त्यांचे वक्तव्य म्हणजे हवेतील बाण नाहीत.

पियूष गोयल यांनी तुणतुणे वाजवायला सुरुवात केली

नवाब मलिक यांच्या खळजनक वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील भाजपची फौज ठाकरे सरकारविरोधात उतरून सरकार कसे अपयशी वगैरे असल्याचे वक्तव्य करु लागली. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी महाराष्ट्राची वकिली करण्याचे सोडून जावडेकर यांच्या प्रमाणे महाराष्ट्र विरोधी तुणतुणे वाजवायला सुरुवात केली. गोयल यांचा दावा आहे की, प्राणवायूचा सर्वाधिक साठी महाराष्ट्रालाच होत आहे तरी देखील ठाकरे सरकार कोरोनाशी लढण्यात अपयशी ठरत आहे. महाराष्ट्राला सर्वाधिक प्राणवायू देऊन केंद्र सरकार मेहेरबानी करत आहे काय ? असा प्रश्न पडतो.