…म्हणून तापसी अन् अनुरागच्या घरावर Income Tax ची धाड – शिवसेना

पोलीसनामा ऑनलाईनः दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या घरावर आयकर विभागाने धाडी टाकल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. यावरून विरोधकांकडून मोदी सरकारवर टीकेची राळ उडवली जात आहे. याच मुद्द्यावरुन शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. चित्रपटसृष्टीतल्या अनेक महान उत्सवमूर्तींनी शेतकरी आंदोलनासंदर्भात विचित्र भूमिका घेतली. त्यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा तर दिला नाहीच, उलट जगभरातून जे लोक शेतकऱ्यांना पाठिंबा देत होते त्यांचा पाठिंबा म्हणजे आपल्या देशात ढवळाढवळ असल्याचे मत या उत्सवमूर्तींनी व्यक्त केले. पण तापसी, अनुराग कश्यपसारखी मोजकी मंडळी शेतकरी आंदोलनाच्या बाजूने उभी राहिली. त्याची किंमत त्यांना चुकवावी लागत आहे, असे म्हणत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानेच त्यांच्यावर कारवाई होत असल्याचे टीकास्त्र शिवसेनेने पंतप्रधान मोदीवर सोडले आहे.

केंद्र सरकारविरुद्ध टीका करणे म्हणजे देशद्रोह नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले असतानाच मोदी सरकारविरुद्ध परखड बोलणाऱ्या कलाकार, निर्माते-दिग्दर्शकांवर आयकर विभाग धाडी घालत आहे. तापसी पन्नू, अनुराग कश्यप, विकास बहल, सिने वितरक मधू मँटेना हे त्यात प्रमुख आहेत. मुंबई-पुण्यात 30 पेक्षा जास्त ठिकाणी धाडी घातल्या. तापसी, अनुराग हे त्यांची मते परखडपणे मांडत असतात. एक प्रश्न यामुळे असा निर्माण होतो की, सिनेसृष्टीतले इतर सर्व व्यवहार, उलाढाली स्वच्छ आणि पारदर्शक आहेत, अपवाद फक्त तापसी आणि अनुराग यांचा, कश्यप यांचा असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. 2011 मध्ये केलेल्या एका व्यवहारासंदर्भात हे छापे आहेत. ज्याअर्थी इन्कम टॅक्सने धाडी घातल्या त्याअर्थी कुठे तरी गडबड आहेच. पण धाडी घालण्यासाठी किंवा कारवाई करण्यासाठी फक्त याच लोकांची का निवड केली? बॉलीवूडमध्ये जी कोटीच्या कोटी उड्डाणे रोज होतात ते काय गंगाजलाच्या प्रवाहातून वर येतात का ? लॉकडाऊनमुळे बॉलीवुड हा एक मोठा उद्योग व्यवसाय आर्थिक संकटात सापडला असताना त्यावर राजकीय सूडबुद्धीने असे हल्ले करणे योग्य नाही. मोदी सरकारची उघड चमचेगिरी करणारे कित्येकजण सिनेसृष्टीत आहेत. त्या सगळ्यांचे व्यवहार आणि उलाढाली धुतल्या तांदळाप्रमाणे स्वच्छ आहेत काय? असे शिवसेनेने म्हटले आहे.

अभिनेत्री दीपिका पदुकोणने दिल्लीतील जेएनयुमध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांची भेट घेताच तिच्याबाबतीतही छुपे आंदोलन, बहिष्काराचे हत्यार चालविण्यात आले. हे सर्व करणारे कोण आहेत किंवा कोणत्या विचारप्रवाहाचे आहेत. पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला ज्या घृणास्पद पद्धतीने अटक केली. त्यावर जगभरात मोदी सरकारवर टीका झाली. यात देशाचीच बेइज्जती होत असते. सर्वच प्रकारच्या स्वातंत्र्याचे हवन सध्या देशात होत आहे. त्यात केंद्रीय तपास यंत्रणांचे निःपक्ष काम करण्याचे स्वातंत्र्यही जळून गेले आहे. तापसी, अनुराग कश्यपप्रकरणी तेच घडल्याची टीका सेनेने सामनातून भाजपावर केली आहे.