आयकर धाडीवरून ‘सामना’तून मोदी सरकारवर ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कृषी विधेयके रद्द करण्यासाठी पंजाब हरयाणातील शेतकरी आंदोलनास बसला या आंदोलनास देश विदेशातून पाठिबा मिळत आहे. या आंदोलनावरून मोदी सरकारला वारंवार शिवसेनेने कोंडीत पकडले आहे. दरम्यान, दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या घरावर आयकर विभागाने धाडी टाकल्यानंतर विरोधकांनी राजकीय हेतूने या धाडी टाकण्यात आल्याचे सांगत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. हाच मुद्दा उचलत शिवसनेने पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. देशातील सिनेसृष्टीतल्या अनेक महान उत्सवमूर्तींनी शेतकरी आंदोलनासंदर्भात विचित्र भूमिका घेतली.

शेतकरी आंदोलनाला पाठींबा पण जे पाठींबा देत आहे त्यांच्यावरच टीका करण्यास सुरुवात केली मात्र अनुराग कश्यप, तापसी पन्नू हे मात्र अपवाद ठरले. तापसी, कश्यप यांसारखी मंडळी मात्र शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम राहिली आणि याचीच किमत त्यांना मोजावी लागत असल्याची टीका शिवसेनेने मुखपत्र असलेल्या सामनातील अग्रलेखातून केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारविरुद्ध टीका करणे म्हणजे देशद्रोह नाही, असे मत मांडले. आणि त्यानंतर सुरु झाल्या आयकर विभागाच्या धाडी. यामध्ये केवळ मोदीसरकारविरुद्ध बोलणाऱ्या कलाकार, सिनेसृष्टीतील निर्माते-दिग्दर्शकांवर ‘इन्कम टॅक्स’ने धाडी घालायला सुरुवात केली आहे. जेथे धाडी घातल्या त्यामध्ये तापसी पन्नू, अनुराग कश्यप, विकास बहल, सिने वितरक मधू मँटेना यांचा समावेश आहे. मुंबई-पुण्यात ३० पेक्षा जास्त ठिकाणी धाडी घातल्या. तापसी पन्नू, अनुराग कश्यप हे त्यांची मते परखडपणे मांडत असतात. आयकरने टाकलेल्या धाडीमुळे एक प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे हिंदी सिनेसृष्टीतले इतर सर्व व्यवहार, उलाढाली स्वच्छ आणि पारदर्शक आहेत, अपवाद फक्त तापसी आणि अनुराग कश्यप यांचा, असे म्हणत सामनाच्या अग्रलेखातुन मोदी सरकारला खडे बोल सुनावले आहे. शेतकरी आंदोलनासंदर्भात जगभरातून जे लोक शेतकऱ्यांना पाठिंबा देत होते त्यांचा पाठिंबा म्हणजे आपल्या देशात ढवळाढवळ असल्याचे मत सिनेसृष्टीतल्या अनेक महान उत्सवमूर्तींनी व्यक्त केले. पण तापसी, अनुराग कश्यपसारखी मोजकी मंडळी शेतकरी आंदोलनाच्या बाजूने उभी राहिली. त्याची किंमत त्यांना चुकवावी लागत आहे, असे म्हणत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानेच त्यांच्यावर कारवाई होत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

काय म्हंटल आहे सामनाच्या अग्रलेखात
हे छापे २०११ मध्ये केलेल्या एका व्यवहारासंदर्भात आहेत. या मंडळींनी एक ‘प्रॉडक्शन हाऊस’ स्थापन केले व त्याबाबत करचुकवेगिरीचा हा मामला आहे. ज्याअर्थी इन्कम टॅक्सने धाडी घातल्या त्याअर्थी कुठे तरी गडबड आहेच, पण धाडी घालण्यासाठी किंवा कारवाई करण्यासाठी फक्त याच लोकांची का निवड केली? तुमच्या त्या ‘बॉलीवूड’मध्ये जी कोटीच्या कोटी उड्डाणे रोज होत असतात ते काय गंगाजलाच्या प्रवाहातून वर येतात? पण व्यवहारात कोठे तरी पाणी मुरतच असल्याने सरकारच्या तालावर नाचायचे व बोलायचे हेच आतापर्यंत घडत आले. त्यातले काही लोक मात्र स्वाभिमानी किंवा वेगळ्या धाटणीचे असतात, असेही सामनातून म्हटले आहे.

लॉकडाऊन काळात ‘बॉलीवूड’ प्रचंड अडचणीत आहे. चित्रीकरण, नव्या निर्मिती बंद आहेत. सिनेमागृहे बंद आहेत. एक मोठा उद्योग व्यवसाय आर्थिक संकटात सापडला असताना त्यावर राजकीय सूडबुद्धीने असे हल्ले करणे योग्य नाही. मोदी सरकारची उघड चमचेगिरी करणारे कित्येकजण सिनेसृष्टीत आहेत. त्यातले तर मोदी सरकारचे अनेकजण सरळ लाभार्थीच आहेत. त्या सगळ्यांचे व्यवहार आणि उलाढाली धुतल्या तांदळाप्रमाणे स्वच्छ आहेत काय? माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भाजप आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केल्यामुळे कारवाई होत असल्याचे आरोप फेटाळले आहेत. तपास यंत्रणांकडे जी खात्रीशीर माहिती येते त्याआधारे कारवाई केली जाते, अशी ‘दिव्य’ माहिती जावडेकरांनी दिली आहे. म्हणजे बॉलीवूडमधील भलेबुरे धंदे जणू समस्त देशवासीयांना माहीतच नव्हते असे केंद्रीय मंत्र्यांना म्हणायचे आहे काय?, असे सांगत शिवसेनेने सामनातून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावरही निशाणा साधला आहे.

‘सत्ताधाऱ्यांच्या पालखीचे भोई होता येत नाही’
सगळ्यांनाच सत्ताधाऱ्यांच्या पालखीचे भोई होता येत नाही. काहीजण पाठीला कणा आहे हे वेळप्रसंगी दाखवत असतात व पडद्यावर ज्या संघर्षमय भूमिका करतात त्याप्रमाणे प्रत्यक्ष जीवनात जगण्याचा प्रयत्न करतात. ‘पिंक’, ‘थप्पड’, ‘बदला’ अशा चित्रपटांत तापसीने केलेल्या भूमिका ज्यांनी पाहिल्या त्यांना तापसी इतकी बाणेदार का? असे कोडे पडणार नाही. अनुराग कश्यपच्या बाबतीतही तेच म्हणावे लागेल. त्यांचे विचार कदाचित पटत नसतील, पण त्यांना त्यांचे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहेच.

‘…यात देशाचीच बेइज्जती होतेय’
‘जेएनयू’मध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांची दीपिका पदुकोणने भेट घेताच तिच्याबाबतीतही छुपे आंदोलन, बहिष्काराचे हत्यार चालविण्यात आले. दीपिकाचे चित्रपट ठरवून पाडण्याचे प्रयोग झालेच, पण समाजमाध्यमांवर तिच्याविरुद्ध घाणेरड्या मोहिमादेखील राबविण्यात आल्या. हे सर्व करणारे कोण आहेत किंवा कोणत्या विचारप्रवाहाचे आहेत ते सोडून द्या, पण अशा कृतीतून ते देशाची प्रतिष्ठा नक्कीच वाढवत नाहीत. पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला ज्या घृणास्पद पद्धतीने अटक केली त्यावर जगभरात मोदी सरकारवर टीका झाली. यात देशाचीच बेइज्जती होत असते. गोमांस प्रकरणात झुंड-बळी गेले, पण भाजपाशासित राज्यांत गोमांस विक्री जोरात सुरूच आहे. यावर कोणीच कसे बोलायचे नाही? सर्वच प्रकारच्या स्वातंत्र्याचे हवन सध्या देशात होत आहे. त्यात केंद्रीय तपास यंत्रणांचे निःपक्ष काम करण्याचे स्वातंत्र्यही जळून गेले आहे. तापसी, अनुराग कश्यपप्रकरणी तेच घडले आहे!, अशी टीकाहि शिवसेनेनं भाजपावर केली आहे.