राजधानी जळत असताना गृहमंत्री शहा कुठं आहेत ? शिवसेनेची ‘खरमरीत’ टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत आगडोंब उसळलाय असं असताना कणखर असणारे गृहमंत्री कुठे आहेत असा सवाल शिवसेनेने ‘सामना’मधून केलाय. राजधानी दिल्लीतल्या दंगलीने देशभर वादळ निर्माण झालंय. या दंगलीत 38 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जातोय. विरोधी पक्षांनी सरकार विरुद्ध टीकेची झोड उठवलीय. शिवसेनेनेही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली आहे. दिल्ली जळत असताना गृहमंत्री अमित शहा कुठेच दिसत नाहीत असं अग्रलेखात शिवसेनेने म्हटले आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस अमित शहा यांनी गल्ली बोळात जाऊन पत्रक वाटली होती, तेव्हा त्यांना वेळ होता. पण आता ते कुठेच दिसत नाहीत. राजधानीतला हिंसेचा धूर देशाला गुदमरून टाकत आहे. त्या धुरात देशाचे गृहमंत्री कुठेच दिसत नाहीत. चिंता वाटावी अशी टीका अमित शहा यांच्यावर करण्यात आली आहे.

अजून काय आहे सामनाच्या अग्रलेखात
दिल्ली जळत असताना अमित शहा हे कुठे होते ? काय करीत आहेत ? दिल्लीत सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे आणि ३८ जणांचे बळी गेले आहेत. समजा काँग्रेस चे सरकार असते तर विरोधी बाकांवर भारतीय जनता पक्षाचे महामंडळ असते तर दंगलीबद्दल गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला असता. गृहमंत्री अपयशी ठरल्याचे खापर फोडून ‘‘राजीनामा हवाच !’’ असा आग्रह धरला असता, पण आता असं नाही होणार कारण भाजप सत्तेत आहे आणि विरोधी पक्ष हा कमजोर आहे. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी अमित शहा घरपोच पत्रिका वाटत फिरत होते. पण संपूर्ण दिल्लीत हिंसेचा आगडोंब पेटला असताना हेच गृहमंत्री कुठे दिसले नाहीत व यावरच विरोधी पक्ष संसदेच्या अधिवेशनात गोंधळ उडवू शकतो. विरोधी पक्षाने दिल्लीतील दंगलीचा प्रश्न उपस्थित केलाच तर त्या सगळ्यांना देशद्रोही ठरवले जाईल काय ? हाच प्रश्न आहे.