West Bengal Election : पश्चिम बंगाल निवडणुकीबद्दल शिवसेनेची मोठी घोषणा

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक लढविलेल्या शिवसेनेने आता पश्चिम बंगालमध्येही आपली ताकद आजमावून पाहणार का, अशी चर्चा सुरु होती. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करून या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. सध्याची परिस्थिती पाहता बंगालमध्ये ममतादीदी विरुद्ध सगळे असा सामना आहे. सगळे एम, म्हणजेच मनी, मसल आणि मीडिया एकट्या ममतांविरोधात वापरले जात आहेत. त्यामुळे बंगालमध्ये निवडणूक न लढवण्याचा आणि ममता दीदींसोबत ठामपणे उभे राहण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. ममता दीदींना उत्तम यश लाभो. कारण त्या बंगालच्या खऱ्या वाघीण असल्याचे राऊतांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेनंतरची अपडेट मी तुम्हाला देत असल्याचे राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच राजकीय वातावरण तापू लागले आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होणार असल्याचे दिसत आहे. एकीककडे ममता बॅनर्जी आपला गड वाचविण्याच्या प्रयत्नात आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून ममताच्या गडाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला आहे. यातच तृणमूल काँग्रेसला अनेकजण सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे तृणमूलच्या सर्वेसर्वा आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने ममता दीदीसोबत ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.