महाविकास सरकारमध्ये मतभेद ?, शिवसेनेनं पुन्हा काँग्रेसला डिवचलं, ‘या’ कारणावरून नव्या वादाला तोंड फुटलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात शहरांच्या नामांतरणाचा वाद थाबण्याचे नाव काहींघेत नाही. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर असे केल्यावरून काँग्रेसने शिवसेनेला सुनावलं होतं. त्यावरून राज्यात वादंग उठले होते. ते शमते न शमते तोपर्यंत पुन्हा CMO ने ट्विट करून उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव करत काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे राज्यात औरंगाबाद, उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यांच्या नावावरून महाविकास आघाडीत कुरघोडी होण्याची शक्यता आहे. मात्र, काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी धाराशिव म्हणा किंवा संभाजीनगर, जोपर्यंत मंत्रिमंडळात कोणताही निर्णय होत नाही तोवर त्याला अर्थ नाही, महाविकास आघाडी सरकार मजबूत असे म्हणत यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वैद्यकीय खात्याबाबत निर्णय घेण्यात आला. या निर्णयाबाबत CMO नं ट्विट करून म्हटलंय की, धाराशिव-उस्मानाबाद येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याला सलग्न ४३० खाटांचे रुग्णालय निर्माण करणे, यात उस्मानाबादचा धाराशिव उल्लेख करण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटलं, काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी धाराशिव म्हणा किंवा संभाजीनगर, जोपर्यंत मंत्रिमंडळात कोणताही निर्णय होत नाही तोवर त्याला अर्थ नाही, महाविकास आघाडी सरकार मजबूत आहे. काँग्रेसचा कोणत्याही शहराच्या नामांतरणाला विरोध आहे. महाविकास आघाडी सरकार आणताना किमान समान कार्यक्रम आखण्यात आला, त्यामध्ये कुठेही नामांतरणाचा भाग नाही असं त्यांनी स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले होते बाळासाहेब थोरात ?
औरंगाबादचा संभाजीनगर उल्लेख केल्यानंतर काँग्रेसने याला विरोध दर्शवला होता.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला ठणकावलं होतं, छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे अशी तंबी दिली होती.

महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे अशा शब्दात काँग्रेसनं शिवसेनेला सुनावलं होतं.

चुकून टाइप झालं असेल, समज देऊ : अस्लम शेख
संभाजीनगर उल्लेख झाल्यानंतर काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांनी सावध प्रतिक्रिया देत ‘कधीतरी टाइप करताना चूक होत असते. त्यामुळे CMO चं ट्विटर हॅंडल करणारऱ्या व्यक्तीला आम्ही समज देऊ’ असं सांगत नामांतरण विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. आता पुन्हा उस्मानाबाद की धाराशिव यावरूनही काँग्रेस-शिवसेना आमनेसामने येण्याची चिन्हं दिसत आहेत.