शिवसेनेला मिळालं पुन्हा ‘अवजड’ ; ‘या’ नेत्यानं केली ‘सारवासारव’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी मोठ्या दिमाखदार सोहळ्यात पार पडला. यात भाजपप्रणीत आघाड़ीच्या घटक पक्षांना सोबत घेत त्यांनाही मंत्री मंडळात स्थान देण्यात आले असून मंत्रिमंडळाचे खातेवाटपही जवळपास निश्चित झाले आहेत. परंतु शिवसेनेला मात्र नेहमीप्रमाणेच अवजड उद्योग खातेच देण्यात आले आहे. यामुळे शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी सारवासारव केली आहे.

पंतप्रधान मोदींच्या शपथविधीला उद्वव ठाकरे एक दिवस अगोदरच दिल्लीला गेले होते. यावेळी ते रेल्वेमंत्रीपद मागतील आणि शिवसेनेला दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपदे देतील अशी चर्चा होती. मात्र, ही चर्चा फोल ठरली आहे. खासदार अरविंद सावंत यांना अनंत गीते यांचेच खाते देण्यात आले आहे. त्यासोबतच सार्वजनिक उपक्रम हेही खाते देण्यात आले आहे. शिवसेना आधीच नाराज असताना संजय राऊत यांनी सारवासारव करत सार्वजनिक उपक्रम हेही महत्त्वाचे खाते असल्याचे म्हटले आहे. तसेच देशात रोजगार मिळावा, अशी जबाबदारी असल्याचेही राऊत यांनी सांगितले.

केंद्रातील मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाबाबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पक्षाची भुमिका मांडतील. सर्व माहिती घेऊन ते बोलतील. कोणाला कोणते मंत्रीपद द्यावे, हा पंतप्रधानांचा अधिकार असतो. देशाच्या विकासाचे पंतप्रधानांचे स्वप्न आहे आणि त्यात अवजड उद्योग मंत्रालयाचाही महत्त्वाचा वाटा आहे, असे राऊत यांनी सांगितले.