ज्येष्ठांना डावलून प्रियांका चतुर्वेदींना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेत आलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांना शिवसेनेने राज्यसभेची उमेदवारी दिल्याने शिवसेनेत धुसफूस सुरु झाली आहे. चंद्रकांत खैरे आणि दिवाकर रावते या ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेत्यांना डावलण्यात आल्याने शिवसेनेत नाराजी पसरली आहे. प्रियांका चतुर्वेदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा हात सोडून शिवबंधन बांधले होते. राज्यसभेतल्या 55 जागांसाठी मार्च अखेरीस मतदान होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश आहे.

अकरा महिन्यापूर्वी शिवसेनेत आलेल्या प्रियांका चतुर्वेदी राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होत्या. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून त्यांचे जोरदार प्रयत्न सुरु होते. चतुर्वेदी या पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय मानल्या जातात. शिवसेनेत प्रवेश करताना आदित्य यांनीच त्यांच्या हाती शिवबंधन बांधलं होतं. आदित्य यांच्या निकटवर्तीय असल्यानं राज्यसभेच्या शर्यतीत चतुर्वेदी यांचं पारडं जड मानलं जात होतं. अखेर पक्षातल्या ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना मागे टाकत चतुर्वेदी यांनी उमेदवारी मिळवली.

शिवसेनेच्या वाट्याला एक जागा आल्याने या जागेवर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे आणि दिवाकर रावते यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता होती. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत खैरे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे औरंगाबाद राखण्यासाठी खैरेंना शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. तसेच औरंगाबाद पालिका निवडणुका आणि एमआयएमच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर खैरेंना शिवसेना राज्यसभेवर पाठवेल असेही बोलले जात होते.

मात्र, शिवसेनेने खैरे आणि रावते यांचा पत्ता कट केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राज्य सभेच्या एका जागेसाठी रावते, खैरे यांच्या पाठोपाठ शिवाजीराव आढळराव पाटील आणि अनंत गीते यांची नावे चर्चेत होती. मात्र, सर्वांचा पत्ता कट करून प्रियांका चतुर्वेदी यांनी उमेदवारी दिल्याने शिवसेनेत धुसफूस सुरु झाली आहे.