भाजपमध्ये ‘कुजबूज’ सुरू ! शिवसेनेला एक-दोन वर्षे मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरून भाजप व शिवसेनेत तणाव निर्माण झाला होता. भाजपने दिलेल्या शब्दाला जागावे यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठाम होते. तर आम्ही असा शब्दच दिला नाही, अशी भूमिका भाजपने घेतली होती. त्यामुळे बहुमत असूनही अद्याप युतीची सत्ता स्थापन न होता काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने मिळून सरकार बनवले. भाजपवर विरोधी पक्षात बसण्याची नामुष्की ओढवल्यामुळे शिवसेनेला एक-दोन वर्षे मुख्यमंत्रीपद द्यायला हवं होतं अशी कुजबूज भाजप नेत्यांमध्ये सुरू झाली आहे.

राज्यात सत्ता स्थापनेत अपयश आल्यानंतर पक्षातंर्गत मतभेद आता समोर येऊ लागले आहेत. भाजपमधील या कुजबुजीने भाजप नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. निवडणुकीत उमेदवारी नाकारणे, पक्षातील महत्त्वाच्या उमेदवारांचा झालेला धक्कादायक पराभव आणि निवडणुकीनंतर सत्तास्थापन करण्यात आलेले अपयश यामुळे पक्षात नाराजी आहे.

सत्ता गेल्यामुळे जनसंपर्क कमी होण्याची भीती भाजपमध्ये निर्माण झाली आहे. त्यातूनच शिवसेनेला एक-दोन वर्षे मुख्यमंत्रीपद दिल्यास काय बिघडले असतं, अशी चर्चा नेते करत आहेत. महाराष्ट्रात युतीचे सरकार स्थापन व्हायला हवे होते. जनतेने तसा कौल दिला होता. आम्ही दोन पावले मागे गेलो असतो, नक्कीच मार्ग निघाला असता असं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी वक्तव्य केले आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नाराजांना एकत्र आणून फडणवीसांच्या नेतृत्वाविरोधातआवाज उठवायला सुरुवात केली आहे. भाजपच्या आजच्या स्थितीला नेतृत्वच जबाबदार असून त्यांनी निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारावी, अशा शब्दांत खडसे यांनी फडणवीसांवर टीका केली.