काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रियांका चतुर्वेदींची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या प्रियांका चतुर्वेदी यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून सांगण्यात आले आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या राहिलेल्या प्रियांका यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला होता.

शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड झाल्याबाबतचे ट्विट प्रियांका यांनी केले असून यात उद्धव ठाकरे त्यांचे आभार मानण्यात आले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले होते. आता त्यांच्याकडे उपनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

काँग्रेसवर प्रियांका नाराज

प्रियांका यांची काँग्रेस पक्षावर नाराजी होती. “लोकसभा निवडणुकीत मला तिकीट मिळेल अशी आशा होती. मात्र ते न मिळाल्याने मी पक्ष सोडला, असे म्हणता येणार नाही. मी १० वर्षे काँग्रेसची नि:स्वार्थीपणे सेवा केली. आता मी विचार केल्यानंतरच शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मी मुंबईकर असल्याने मला शिवसेनेबाबत पूर्वीपासून आत्मियता वाटत आली आहे”, असे प्रियांका चतुर्वेदींनी स्पष्ट केले होते.

१९ नोव्‍हेंबर १९७९ मध्‍ये प्रियांका चतुर्वेदी यांचा जन्‍म मुंबईत झाला. प्रियांका चतुर्वेदी यांचे कुटुंब मुळचे उत्तर प्रदेशमधील आहे. त्‍यांचे शिक्षण मुंबईत झाले आहे. राजकारणाच्‍या पलीकडे त्‍यांची सोशल मीडियावर ब्‍लॉगर म्‍हणून एक वेगळी ओळख आहे. या ब्‍लॉगच्‍या माध्‍यमातून विविध पुस्‍तकांचे समीक्षापर लेखन करतात. देशातील टॉप टेन ब्‍लॉगपैकी एक ब्‍लॉग प्रियांका चतुर्वेदी यांचा आहे.