‘या’ कारणामुळं बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना आक्रमकपणे उतरणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या संकटातही बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळं निवडणुकीतील विजयासाठी राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू झाल्याचं दिसत आहे. यादरम्यान बिहारमधील शिवसेने(shiv sena)च्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी मुंबईत येऊन शिवसेने(shiv sena)चे नेते आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीमध्ये बिहार निवडणुकीच्या मैदनात शिवसेनेनंही उतरावं अशी मागणी बिहारमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यानुसार शिवसेना बिहार विधासभेच्या 50 जागांवर उमेदवार उभे करणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावरून बिहार सरकारनं महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांच्या बदनामीचा घाट घातला होता असा आरोप शिवसेनेकडून होत आहे. त्यामुळंच बिहार सरकारच्या राजकीय षडयंत्राला निवडणुकीच्या मैदानातून उत्तर देण्याचं शिवसेनेनं ठरवलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शिवसेनेच्या धनुष्य बाण या निवडणूक चिन्हावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळं दुसरं चिन्ह घेऊन शिवसेना मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. बिहार सरकारनं मूळ प्रश्न बाजूला ठेवून सुशांत प्रकरणावरून कसं राजकारण केलं हाच शिवसेनेच्या प्रचाराचा अजेंडा असेल अशी माहिती माहिती समजत आहे.

बिहार प्रमुख हौसलेंद्र शर्मा यांनी प्रसार माध्यमांसोबत बोलताना सांगितलं की, बिहारमधील शिवसैनिक निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहे. कमीत कमी 50 जागा लढवण्याचा विचार आहे. त्यामुळं यासंदर्भात बोलण्यासाठी आम्ही संजय राऊत यांची भेट घेतली आहे. बिहारमधील शिवसैनिकांची जी मागणी आहे ती संजय राऊतांना सांगितली आहे. त्यामुळं आता निवडणूक लढवायची की नाही यासदंर्भात अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील असं हौसलेंद्र शर्मा यांनी सांगितलं.

2015 मध्ये लढवल्या होत्या 80 जागा

2015 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं 243 जागांपैकी 80 जागा लढवल्या होत्या. यात शिवसेनेचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. परंतु शिवसेनेला एकूण 2 लाख 11 हजार 131 एवढी मते मिळाली होती.