‘सत्तेसाठी शिवसेना ‘लाचार’, हक्कभंग आणला तरी आवाज उठवणार’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात आम्ही सभागृहात काढलेले गौरवोद्गार विधिमंडळ कामकाजातून काढून टाकणारे हे सभागृह भारताचे आहे की ब्रिटिशांच्या विधानसभेचे ? या मुद्द्यांवरील चर्चेदरम्यान सभागृहात शिवसेना आमदार सुद्धा शांत बसले होते. शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली असली तरी आम्ही सावरकरांचा अवमान खपवून घेणार नाही, असे म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला.

सावरकरांच्या मुद्द्यावर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपने आक्रमक होण्याचा प्रयत्न केला. मात्र, अध्यक्षांनी सभागृह दहा मिनिटांसाठी स्थगित केल्यानंतर घोषणाबाजी करत भाजप आमदार बाहेर पडले. यानंतर देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्य सरकारचे हे वर्तन दुर्दैवी आहे. आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भात नियम ५७ ची नोटीस दिली होती. त्याबाबत बोलत असताना आमच्या भाषणातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भातील गौरवोद्गार कामकाजातून काढून टाकण्यात आले. हे सर्व घडत असताना मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे आमदार शांत बसले होते. सत्तेसाठी शिवसेना लाचार झाली आहे, अशी टीका फडणवीसांनी केली.

सावरकरांबद्दल बोलण्यापासून आम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. सावरकर हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. आमच्यावर हक्कभंग आला तरी चालेल. पण, त्यांचा अपमान कदापि सहन करणार नाही. जोपर्यंत राहुल गांधी या देशाची माफी मागत नाही, तोपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/