भाजपच्या ‘बोकड पार्टी’च्या निषेधार्थ शिवसेनेकडून जिल्हा परिषदेत पूजा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अयोध्येत राममंदिर भूमिपूजनाच्या दिवशी ‘बोकड पार्टी’ करून नंतर श्रीराम पूजन करणार्‍या भाजपच्या काही जिल्हा परिषद सदस्यांच्या कृतीनेधुळे जिल्हा परिषद शुध्दीकरणासाठी सत्यनारायणाची पूजा आयोजित केली होती.

राममंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या दिवशी जिल्हा परिषदच्या सर्वसाधारण सभेनिमित्त मांसाहारी जेवण देण्यात आले. भाजपच्या काही जिल्हा परिषद सदस्यांनी त्यादिवशी बोकड पार्टी केली. त्यानंतर त्यांनी श्रीराम पूजन केले. यासंदर्भातील माहिती मिळाल्यावर भाजपवर सर्व बाजूंनी टीका होऊ लागली. त्यानंतर काल शिवसेना उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे आणि त्यांच्या जिल्हा परिषद सदस्य पत्नी सुनिता सोनवणे यांनी जिल्हा परिषदेच्या आवारात गोमूत्र शिंपडून थेट सत्यनारायणाची पूजा केली.

भ्रष्टाचारामुळे आणि बोकड फस्त करणार्‍या भाजप सदस्यांमुळे जिल्हा परिषद बदनाम झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेला गोमूत्र शिंपडून आणि सत्यनारायणाची पूजा करून पवित्र करण्याचा आमचा प्रयत्न आहे. श्रावण महिन्यात अशुभ झालेली वास्तु किंवा कलंकित झालेली व्यक्ती यांचा कलंक पुसला जावो, अशी प्रतिक्रिया सोनवणे यांनी दिली.