शिवसेना हा अस्तित्व संपत चाललेला पक्ष : चंद्रकांत पाटील

पोलिसनामा ऑनलाईन – सत्ता असा हा एक फेविकॉल आहे तो चिकटून बसतो. विविध प्रकारचे अपमान सहन करायला लावतो. राष्ट्रवादी खूप महत्त्व घेते आहे. काँग्रेस असून नसल्यासारखा पक्ष आहे आणि शिवसेनेचं अस्तित्व संपत चाललं आहे असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. शिवसेना हा अस्तित्व संपत चाललेला पक्ष आहे असं म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. तसच संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेबद्दल विचारलं असता कोण संजय राऊत? असं विचारत त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला आहे.

नेमकं काय म्हणाले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे ही कुठे तरी वादाची सुरुवात आहे असं मला वाटत नाही. पदरात काही पाडून घ्यायचं असेल तर नाराजी व्यक्त करायची आणि मग हवं ते मिळालं की नाराजी दूर करायची असा साधारणतः पॅटर्न आहे. मात्र पहिल्यांदाच सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. त्यामुळे पुढे काय ते पहावं लागेल. आत्ता ज्या विधानपरिषद निवडणुका झाल्या त्यात आमची एक सीट जिंकली. इतर पाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आहेत. शिवसेनेला एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे शिवसेना अस्तित्त्व संपत चाललेला पक्ष आहे.

अजित पवारांनी जे खुलं आव्हान भाजपाला दिलं आहे त्यावर विचारलं असता चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत की, “गरजेल तो पडेल काय? हे उत्तर मी याआधीच दिलं आहे. तसंच अजित पवार जर हे सांगत असतील तर त्यांना त्यावेळी २८ आमदारही का टिकवता आले नाहीत? त्यामुळे जाऊद्या या गोष्टी. अजित पवार हे अत्यंत कर्तव्यदक्ष आहेत. माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यांनी अशी वक्तव्य करुन त्यांच्या प्रतिमेला ठेच लागेल असं वागू नये.”