भाजपच्या सत्तास्थापनेत शिवसेना ‘अडथळा’ नाही, संजय राऊतांनी राज्यपालांसमोर मांडली ‘बाजू’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि नेते रामदास कदम यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. ही भेट महत्वाची असल्याचे मानले जात असताना संजय राऊत यांनी सांगितले की ही सदिच्छा भेट होती. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की आम्ही राज्यपालांशी चर्चा केली, राज्यपालांनी आमची बाजू ऐकून घेतली. राज्यात सत्ता स्थापनेला जो उशीर होत आहे त्याला आम्ही जबाबदार नाही. राज्यात लवकरात लवकर सत्ता स्थापन व्हावी, शिवसेना सत्ता स्थापनेत अडथळा नाही.

राज्यपालांच्या भेटीनंतर संजय राऊत म्हणाले की राज्यपाल कोणत्याही पक्षाचे नाहीत ते तटस्थ आहेत. अनेक वर्षांनी राज्याला देशाची, परिस्थितीची, कायद्याची जाण असलेले राज्यपाल मिळाले आहेत आणि आम्ही त्यांची भेट घेतली.

यावेळी राज्यपालांशी काय चर्चा झाली यावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, आम्ही उद्धव ठाकरेंच्या वतीने राज्यपालांची भेट घेतली. यावेळी बाळासाहेब ठाकरेंचे पुस्तक ‘फटकारे’ त्यांना भेट म्हणून देण्यात आले. उद्धव ठाकरेंची पुस्तके देखील त्यांना भेट देण्यात आली. तर बाळासाहेबांची व्यंगचित्र देखील राज्यपालांनी पाहिली.

राज्यपालांच्या भेटीवेळी संजय राऊत यांच्यासह रामदास कदम देखील उपस्थित होते. राज्यपालांशी त्यांनी जवळपास 1 तास चर्चा करुन शिवसेनेची बाजू मांडली. राज्यात भाजप शिवसेनेत सत्ता स्थापनेवरुन चांगलीच जुंपली आहे. दोन्ही पक्ष मुख्यमंत्री पद सोडण्यास तयार नाही. शिवसेनेकडून रोज दावे – प्रतिदावे करण्यात येत आहेत. भाजप अध्यक्ष अमित शाह यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतल्यानंतर कळत आहे की अमित शाह यांनी शिवसेनेला मुख्यमंत्री पद आणि गृहमंत्री पद देण्यास नकार दिला आहे.

Visit : Policenama.com