शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा द्यायला तयार होतो मात्र : मुख्यमंत्री फडणवीस

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगरमध्ये शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी भाजपा तयार होता. स्थानिक पातळीवर बोलणी सुरू होती.मीसुद्धा सेनेकडून ची मागणी झाल्यास पाठिंबा द्या, असे सुचवले. मात्र महापौर निवडीच्या तीन दिवस आधीपर्यंत शिवसेनेतून कुणीही आमच्याशी बोलण्यास तयार नव्हते, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप-राष्ट्रवादी आघाडीबाबत मुंबईत बोलताना केला.
त्रिशंकू निकाल लागलेल्या अहमदनगर महानगरपालिकेमध्ये 24 जागांसह शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र असे असूनही 14 जागांसह तिसऱ्या स्थानी असलेल्या भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर महापौर व उपमहापौरपद पटकावले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला पाठिंबा दिल्यामुळे राज्यातील राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आले होते. भाजपा आणि शिवसेना यांच्यातील तणावही वाढला आहे. दरम्यान, नगरमध्ये भाजपा शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देण्यास तयार असतानाही तिथे भाजपाचाच महापौर कसा जिंकला, याबाबत फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांसमोर सांगितली.

ते म्हणाले की, पाठिंब्यासाठीचा प्रस्तावही शिवसेनेकडून आला नाही. उलट आम्हीच शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांशी बोलावे. रामदास कदमांना आम्ही पाठिंबा देतोय म्हणून सांगा, अशी गळ घालण्यात आली. मात्र पाठिंब्यासाठी शिवसेनेने  प्रस्ताव दिला पाहिजे, असे महाजन यांनी सांगितले. अखेरपर्यंत आम्ही शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार होतो. अखेरीस शेवटच्या दिवशी महापौर निवडीसंदर्भातील सर्वाधिकार आम्ही स्थानिक नेतृत्वाला दिले.

राष्ट्रवादीला पाठिंबा मागितलाच नाही
सर्वात महत्त्वाचे म्हणजे नगरमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाठिंबा मागितला नव्हता. तिथे आम्ही महापौर आणि उपमहापौरपदाचे उमेदवार दिले होते. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने आपले उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपाला पाठिंबा दिला. त्यामुळे पाठिंबा का दिला हे राष्ट्रवादी काँग्रेसलाच विचारा, असे सांगत नगरमध्ये राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबाबतचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी टोलवून लावला.

पुढील निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधातच

 

नगरमध्ये राष्ट्रवादी पाठिंबा दिला असला तरी पुढे असे काही होणार नाही. भाजपा पुढची निवडणूक 100 टक्के काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसविरोधातच लढणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.