‘या’ कारणामुळं राज ठाकरेंना राज्यपालांनी शरद पवारांना भेटण्याचा सल्ला दिला, शिवसेनेनं डिवचलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई सह राज्यातील वीजग्राहकांना टाळेबंदी काळातील तीन महिन्यांचे वाढीव वीजबिल आल्याने सर्वसामान्यांना लवकरात लवकर दिलासा द्यावा या मागणीसाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. हा प्रश्न राज्य सरकारकडून सुटावा यासाठी तुम्ही जेष्ठ नेते शरद पवारांकडे जावे, असा सल्ला राज्यपाल कोश्यारी यांनी राज ठाकरे यांना दिला. त्यावरुन आता शिवसेनेने राज ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

“राज ठाकरे यांना बहुतेक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे येण्याची अडचण होत असेल. म्हणून राज्यपाल यांनी त्यांना शरद पवारांची भेट घेण्यास सांगितले आहे. तद्वतच, शरद पवार यांच्याकडे हर मर्ज की दवा है,” अशी मिश्किल प्रतिक्रिया राज ठाकरे आणि राज्यपाल यांच्या भेटीवर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये शरद पवार यांचे सर्व चालते. म्हणून आपण देखील शरद पवार यांच्यासोबत बोलणे करा. मी सरकारला पत्र पाठवेन, मात्र त्यावर सरकार काही करेल का, याबाबत मला शंका आहे. त्यामुळे आपण शरद पवार यांच्याशी बोलला तर हा प्रश्न सुटू शकतो. परंतु, मी संबंधित विभगाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करेल, असे राज्यपाल यांनी राज ठाकरेंना सांगितले.

राज ठाकरेंचा शरद पवारांना फोन
राज्यपाल यांनी सांगितल्यानंतर राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार यांनी स्वत: राज ठाकरेंचा फोन आल्याची माहिती दिली आहे. माझे राज यांच्याबरोबर बोलणे झाले असून, राज्यपाल भेटीबाबत त्यांनी माझ्याशी चर्चा केल्याचं पवार यांनी सांगितले. तथापि, भेटीबाबत अजून काही ठरले नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.