सरकारबाबत नंतर बोलू, आदित्य ठाकरेंनी टाळला ‘खूर्ची’चा मोह

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – सरकार स्थापनेचा विषय सुरुच राहील. त्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलतीलच. सध्या महत्त्वाचा विषय आहे तो शेतकऱ्यांच्या नुकसानीचा. त्यासाठीच आम्ही शेतकऱ्यांना भेटून माहिती घेत आहोत, असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राजापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. तुम्ही मुख्यमंत्री व्हावे, अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. या प्रश्नाचे थेट उत्तर देणे टाळत सध्या नुकसान भरपाई महत्त्वाची असल्याचे आदित्य यांनी सांगितले.

क्यार वादळामुळे आलेल्या पावसाने कोकणातली भातशेतीला मोठ्या प्रमाणात दणका दिला आहे. त्याची पाहणी करण्यासाठी रविवारी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. आदित्य ठाकरे रविवारी सकाळी रत्नागिरीत दाखल झाले. त्यांनी प्रथम लांजा तालुक्यातील कुवे येथे भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार विनायक राऊत, पालकमंत्री रवींद्र वायकर, म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत, आमदार राजन सावळी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

सध्या जे राजकीय चर्चा सुरु आहे. ‘कोण कुणाबरोबर आहे’, हे कुणी विचारले तर कुणीही कोणासोबत असले तरी शिवसेना तुमच्यासोबत असल्याचा उद्धवजींचा निरोप घेऊन मी आलोय, असे आदित्य यांनी यावेळी सांगितले. तसेच राजकारण सुरुच राहिल. पण आता शिवसेना शेतकऱ्यांना भेटण्याला प्राधान्य देत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.