संजय राऊतांचा भाजपवर पलटवार, म्हणाले – ‘पहाटेचा शपथविधी घोडेबाजार नाही तर काय गाढवबाजार होता ?’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – जळगाव आणि सांगली महापालिकेतील भाजपची सत्ता गेल्याने राजकरणात चर्चेला उधाण आलं आहे. यावरून भाजप आणि शिवसेनेने मध्ये टीकाटिपणी होत आहे. निवडणूक मुद्द्यावरून भाजपने शिवसेनेवर केलेल्या जोरदार टीकेवर प्रत्त्युत्तर देत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला कडक शब्दात टोला लगावत पहाटेचा शपथविधी घोडेबाजार नाही, तर काय गाढवबाजार होता, असा थेट प्रतिसवाल संजय राऊत यांनी भाजपला विचारला आहे. यावेळी राऊत हे पत्रकार परिषदेत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, घोडेबाजाराचा आरोप कोणी कोणावर करावा ?, भाजपने याआधी घोडेबाजार केला नाही का, असा सवाल राऊत यांनी केला आहे. भाजपने कसा घोडेबाजार केला असे सांगताना, पहाटेचा शपथविधी घोडेबाजार नाही, तर काय गाढवबाजार होता, असा टोला त्यांनी लगावला. तसेच राऊत यांनी शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष बनवावे, अशी मागणी देखील त्यावेळी केली आहे.

दरम्यान, भाजपला जोरदार झटका देत शिवसेनेने भाजपच्या फुटीर नगरसेवकांच्या मदतीने जळगाव महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक जिंकली. शिवसेनेच्या या विजयामुळे भाजपच्या हातून सलग दुसरी महापालिका हातातून गेली आहे. यावरून भाजपने शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. जळगाव पालिका निवडणुकीत शिवसेनेनं घोडेबाजार केला, असा थेट आरोपच भाजपने शिवसेनेवर केला.

तर, जळगाव महापालिकेच्या महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी भाजपच्या प्रतिभा कापसे यांचा तब्बल १५ मतांनी पराभव केला. जयश्री महाजन यांना ४५ मते मिळाली , तर प्रतिभा कापसे यांना ३५ मते मिळाली. भाजपचे २७ नगरसेवक फुटले. तसेच MIM च्या तीन नगरसेवकांनी देखील शिवसेनेलाच मतदान केले. यामुळे शिवसेनेच्या विजयाचा मार्ग सोपा झाला आहे.