कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, ‘या’ शिवसेना नेत्याची मागणी

नगर : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणौत हिने मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कंगनाच्या विरोधात शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. राज्यातील शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांनी तर कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. ते नगर मध्ये बोलत होते

राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे हे आज नगर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुंबई पोलिसांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कंगनाच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, कंगना राणौतचा विषय हा गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. जनतेला सर्व काही समजते. जनता जनार्दन अशा गोष्टींना किंमत देत नाही. जो महाराष्ट्राच्या मातीत राहतो, महाराष्ट्राच्या मातीमधील अन्न खातो, आणि महाराष्ट्राच्या पोलिसांच्या प्रती शंका व्यक्त करतो, पाकिस्तान व्याप्त काश्मीरसोबत मुंबईची तुलना करतो, मला वाटतं अशा व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे, असे भुसे म्हणाले.

काय आहे प्रकरण ?

राम कदम यांनी कंनाला मुंबई पोलिसांनी संरक्षण देण्याची मागणी केल्यानंतर कंगनाने राम कदम यांच्या ट्विटला रिप्लाय दिला आहे. यामध्ये तीने मुंबई पोलिसांवर कडवट टीका केली होती. गुंड आणि मुव्ही माफियांपेक्षा मला आता मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. मला एकतर हिमाचल प्रदेश सरकारची किंवा थेट केंद्राची सुरक्षा हवी आहे. मुंबई पोलिसांची नको, प्लीज, असं तिने म्हटले होते.

यावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी तिच्यावर कडक शब्दांत टीका केली होती. मुंबईत भीती वाटत असेल तर आणि कोणाला इतर राज्याची सुरक्षा हवी असेल तर चंबूगबाळे आवरून निघून जावं, असं राऊत यांनी कंगनाला सुनावलं होत. त्यावर कांगनानं कांगावा करत संजय राऊत मला धमकी दिल्याचं म्हटलं आहे. मला मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय, असं ट्विट केलं. यानंतर राज्यातील राजकारण तापण्यास सुरुवात झाली.