संजय राऊतांचा खिलाडी अक्षयवर निशाणा, म्हणाले – ‘मुंबईचा जेव्हा अपमान होतो, तेव्हा हे सर्व मान खाली घालून बसतात’

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बॉलीवुड अ‍ॅक्ट्रेस कंगना रणावतसोबत सुरू असलेल्या शाब्दिक लढाईत अक्षय कुमारला सुद्धा ओढले आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये संजय राऊत यांनी अक्षय कुमारवर निशाणा साधला आहे. त्यांनी आरोप केला आहे की, जेव्हा कंगनाने मुंबईचा अपमान केला तेव्हा अक्षय कुमारसारखे अभिनेते या शहराच्या समर्थनासाठी उतरले नाहीत. जेव्हा मुंबईचा अपमान होतो, तेव्हा हे सर्व मान खाली घालून बसतात. काही दिवसांपूर्वी कंगनाने मुंबईची तुलना पीओकेसोबत केली होती. यानंतर तिच्या या वक्तव्यावर महाराष्ट्रात संताप व्यक्त होत आहे. राज्याच्या राजकारणातही गदारोळ सुरू झाला. दरम्यान, बीएमसीने कारवाई करत कंगनाच्या मुंबईतील अनधिकृत ऑफिसला बुलडोझर लावला होता.

निशाण्यावर अक्षय कुमार
सामनामध्ये संजय राऊत यांनी लिहिले आहे की, एक नटी (अभिनेत्री) मुंबईत बसून महाराष्ट्रच्या मुख्यमंत्र्यांना आरे कारेच्या भाषेत बोलते. तरीही काही लोकांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही, हे कसले एकतर्फी स्वातंत्र्य? त्यांनी पुढे लिहिले आहे, ’किमान हिंदी चित्रपटसृष्टीतील निम्म्या लोकांनी तरी मुंबईच्या अपमानाचा निषेध करण्यासाठी पुढे यायला हवे होते. कंगनाचे मत हे संपूर्ण चित्रपट जगताचे मत नाही, असे तरी म्हणायला हवे होते. किमान अक्षय कुमारसारख्या मोठ्या कलाकारांनी तरी बाहेर यायला हवे होते. मुंबईने त्यांनाही दिले आहे. मुंबईने प्रत्येकाला दिले आहे, परंतु अनेकांना मुंबईची कृतज्ञता व्यक्त करण्यात त्रास होतो. जगभरातील श्रीमंतांची घरे मुंबईत आहेत. जेव्हा मुंबईचा अपमान होतो तेव्हा हे सर्वजण मान खाली घालून बसतात.

मुंबईवर महाराष्ट्राचा पहिला हक्क
बॉलिवूडमधील खुपच कमी लोकांनी कंगनाच्या विरोधात आवाज उठविला आहे. अनुपम खेर आणि शेखर सुमनसारखे अभिनेते कंगनाच्या समर्थनार्थ उघडपणे बाहेर आले आहेत. बॉलिवूडच्या मोठ्या भागाने या विषयावर मौन बाळगले आहे. असो, अक्षय कुमार सहसा कोणत्याही वादग्रस्त विषयावर आपले मत व्यक्त करत नाही.

चित्रपटसृष्टीवर हल्ला करताना राऊत यांनी पुढे लिहिले आहे की, ’यांच्यासाठी मुंबईचे महत्त्व फक्त शोषण करणे आणि पैसे कमावणे एवढेच आहे. मग जर कोणी दररोज मुंबईवर बलात्कार केला तरी चालेल. या सर्वांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की ’ठाकरे’ यांच्याकडे महाराष्ट्राची सूत्र आहेत. म्हणून भूमिपुत्रांच्या स्वाभिमानासाठी रस्त्यावर उतरून रडा करण्याची गरज वाटत नाही. महाराष्ट्र आणि भूमिपुत्रांचे भाग्य चक्र मुंबईच्या अवतीभोवती फिरत आहे. मुंबई देश किंवा जगाची असली तरी तिच्यावर महाराष्ट्राचा पहिला हक्क आहे.

कंगनाला पुन्हा केले लक्ष्य
कंगनावर पुन्हा एकदा निशाणा साधत संजय राऊत यांनी लिहिले आहे की, ’तिच्या बेकायदेशीर बांधकामावर हातोडा पडला, तर ते माझे राम मंदिर होते, असा ड्रामा तिने केला. परंतु, तिने हे बेकादेशीर बांधकाम कायद्याचे उल्लंघन करून तिच्याद्वारे घोषित पाकिस्तानात केले होते हे जाहीर का केले नाही. मुंबईला पाकिस्तान बोलणे आणि त्याच पाकिस्तानमधील अनधिकृत बांधकामावर झालेल्या सर्जिकल स्ट्राईकवरून छाती बडवणे, हा कसाला खेळ आहे?

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like