उस्मानाबादमध्ये शिवसेना नेत्याचा ग्रामपंचायत समोर निर्घृण खून

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – उस्मानाबाद जिल्ह्यात एका शिवसेना नेत्याचा गावच्या ग्रामपंचायत कार्यालयासमोरच खून झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील देवळाली गावात मंगळवारी रात्री घडली आहे. भूम तालुक्यातील वंजारवाडी पंचायत समितीचे शिवसेनेचे विद्यमान सदस्य बाजीराव तांबे यांचा ग्रामपंचात कार्यालयासमोरच खून करण्यात आला.

देवळाली गावात ही घटना घडली असून गावातील शिवरस्त्यावरून बाजीराव तांबे आणि त्यांचे चुलत भाऊ चंद्रकांत तांबे यांच्यात मागील अनेक दिवसांपासून वाद सुरु होते. या प्रकरणी दोन्ही गटाकडून पोलिसांमध्ये आणि महसूल विभागात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. गावच्या ग्रामपंचायतीसमोर खूनाची घटना घडल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सरु करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री मयत बाजीराव तांबे आणि मुख्य आरोपी चंद्रकांत तांबे यांच्यामध्ये शिवरस्त्याच्या कारणावरून पुन्हा वाद झाले. वाद वाढत जाऊन एकमेकांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर त्यांचा चुलत भाऊ चंद्रकांत याने बाजीराव यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात बाजीराव गंभीर जखमी झाले. बाजीराव रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना उपचारासाठी तातडीने बार्शी येथे हलवण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.

वंजारवाडी पंचायत समितीचे शिवसेनेचे विद्यमान सदस्य बाजीराव तांबे यांच्या खून प्रकरणात त्यांचा चुलत भाऊ चंद्रकांत तांबे याच्यासह 12 जणांविरोधात परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंडा पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून 11 आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.