‘उध्दव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री, फडणवीसांनी आता स्वप्नचं पाहावी’, शिवसेनेच्या नेत्याचा टोला

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावत “उद्धव ठाकरे हे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. त्याचं काम जनतेला आवडल्यामुळे हे सरकार पडणार नाही. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंगेरीलाल के हसीन सपने पाहावे” असं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी ‘आयएएनएस’ आणि ‘सीव्होटर्स’ या संस्थानी संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकप्रियतेच्या बाबतीत देशात पहिल्या ५ मध्ये आले होते. त्याच अनुषंगाने पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले, “गेल्या नऊ महिन्यांत उद्धव ठाकरे यांनी केलेलं काम नागरिकांना आवडलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारबाबत नागरिकांच्यात चांगल्या भावना आहेत. म्हणून हे सरकार पडणार नाही. पण देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदासाठी मुंगेरीलाल के हसीन सपने पाहावीत” अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच भाजपाचे नेते नारायण राणे आणि प्रवीण दरेकर यांनी सुद्धा राज्यातील आघाडी सरकार लवकरच पडेल असं वक्तव्य केलं होत.

त्याला प्रत्युत्तर देताना पाटील यांनी म्हटलं की, “नारायण राणे यापूर्वी कुठे होते आणि आता ते कुठे आहेत. जे ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी काय होत राज्यातील जनतेला माहिती आहे. प्रवीण दरेकर याची सुद्धा तीच परिस्थिती आहे. ते देखील आधी कुठे होते आणि आता कुठे आहेत. त्यांच्या व्यक्तव्यांना जास्त महत्व देण्याची गरज नाही. भाजपचे किती आमदार त्यांच्या सोबत राहतील हे दिसून येईलच,” असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. तर महाविकास आघाडीचे १७० आमदार कायम आमच्या सोबत असल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे.