‘अमृताजी, आदित्य ठाकरेंनी तुमच्या सारखा गायनाचा ‘छंद’ जोपासला नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना आणि भाजपच्या मंत्र्यांमध्ये सुरु झालेलं ट्विटर वॉर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उडी घेतली आहे. हे प्रकरण आणखीनच वाढत चाललं आहे. आदित्य ठाकरे यांच्यावर सर्वकाही वारसाने मिळाले अशा मतितार्थाने अमृता फडणवीस यांनी टीका केल्यानंतर शिवसेनेकडून त्यांना पुन्हा एकदा करारा जवाब देण्यात आला आहे. वडिल मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी गायनाचा छंद जोपासला नाही, असं म्हणत शिवसेनेनं अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

प्रबोधनकार, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वारसा लाभलेले आदित्य ठाकरे यांनी आपले वडील मुख्यमंत्री झाल्यावर (गायनाचे) छंद पूर्ण केले नाहीत; त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडविण्याचा छंद जोपासला आहे, असं म्हणत शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी अमृता फडणवीस यांच्याबाबत टीकेचा राग आळवला आहे. त्यांनी ट्वीट करून अमृता फडणवीस यांना उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले होते फडणवीस ?
एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन फडणवीस यांनी शिवसेनेवर जाहीर भाषणामध्ये टीका केली होती. आझाद मैदान येथे मंगळवारी पार पडलेल्या भाजपाच्या राज्य सरकारविरोधातील आंदोलनामध्ये फडणवीस बोलत होते. “उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या पक्षाने बांगड्या घातल्या असतील पण आम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत. जशास तसे उत्तर कशा पद्धतीने देतात हे भाजपाला ठाऊक आहे. आमच्यामध्ये तेवढे सामर्थ्य आहे,” अशी टीका फडणवीस यांनी शिवसेनेवर केली होती.

आदित्य यांचे प्रत्यत्तर

फडणवीस यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेच्या वृत्ताची बातमी ट्विट करत आदित्य यांनी फडणवीस यांना सुनावले होते. ट्विटवरुन फडणवीस यांना टॅग करत आदित्य यांनी या बांगड्या घातल्या आहेत या वक्तव्याबद्दल माफी मागावी असं म्हटलं होतं. “देवेंद्र फडणवीसजी, सामान्यपणे मी टीकेला उत्तर देत नाही. मात्र या बांगड्या घातल्या आहेत टीकेबद्दल तुम्ही माफी मागायला हवी. सर्व शक्तीशाली, सामर्थ्यवान महिला बांगड्या घालतात. आपलं राजकारण सुरु राहिलं पण आपल्याला अशापद्धतीने टीका करणं बंद केलं पाहिजे. माजी मुख्यमंत्र्यांनी अशी टीका करणे अपमानास्पद वाटतं,” असं आदित्य यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस ?
“कोषामध्ये राहणाऱ्या अळीला आयुष्यातील मजा कधीच कळणार नाही. आदित्य ठाकरे, तुमच्या पूर्वजांनी आरामात विणलेल्या रेश्माच्या जीवावर वैभवात राहून भरभराट झाल्यासारखं आहे तुमचं आयुष्य. देवेंद्र फडणवीस तुमच्या संघर्षाचा मला अभिमान आहे. भाजपाच्या प्रत्येक कष्टकरी सदस्याचाही मला अभिमान आहे,” असं ट्विट अमृता यांनी केलं होतं.