आता नको पुढच्या आठवड्यात चौकशी करा ! प्रताप सरनाईकांच्या विनंतीवर ED चा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर मंगळवारपासून ईडीने कारवाईला सुरवात केली आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. दरम्यान, प्रताप सरनाईक यांना ईडी ने चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावला. त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी सध्या क्वारंटाइन असल्यामुळे पुढच्या आठवड्यात चौकशी करावी ही विनंती ईडीकडे केली होती.

सध्या मी covid-19 नियमानुसार क्वारंटाइन आहे. त्यामुळे मला कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहता येणार नाही. तसेच माझा मुलगा विहंग आणि त्याची पत्नीही आजारी आहेत. त्यामुळे दोघांचेही पुढच्या आठवड्यात चौकशी करण्यात यावी, अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी ईडीकडे केली होती. प्रताप सरनाईक यांच्या विनंतीनंतर “क्वारंटाइन झाल्यानंतर हजर रहा” असा आदेश प्रताप सरनाईक यांना ईडीकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, ज्या दिवशी अर्णब गोस्वामी, कंगना राणावत त्यांच्यावर हक्कभंग दाखल केला. अन्वय नाईक प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू करण्याची मागणी लावून धरली. त्याच दिवशी उद्या काय होणार याचा विचार केला होता. आम्ही संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलो आहोत. शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला आमदार केलं. एका पक्षाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या पक्षाची धोरणे, भूमिका प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट करणं ही जबाबदारी असल्याचं प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितलं. ईडीने धाड टाकली म्हणून तोंड बंद करणार नाही. फाशी दिली तरी ती स्वीकारायची तयारी असल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं होतं. तत्पूर्वी ईडीच्या चौकशीनंतर प्रताप सरनाईक यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला होता. दरम्यान, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी गेल्या काही दिवसात अभिनेत्री कंगना राणावत, पत्रकार अर्णब गोस्वामी या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका केली होती. दोघांविरुद्ध कडक अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला होता. मंत्रिपदं हुलकावणी दिल्यावर पक्षाने सोपवलेली प्रवक्ते पदाची जबाबदारी सरनाईक यांनी चोखपणे पार पाडली.

बदनाम करण्याचा हा कुटील डाव – खासदार संजय राऊत
महाराष्ट्राला बदनाम करण्याचा हा कुटील डाव आहे. कितीही दबाव आणला तरी महाविकासआघाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाही. सरकारी संस्थांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, सुरुवात तुम्ही केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे

चुकून असेल तर घाबरण्याचे कारण नाही – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस
सरनाईक यांच्या घरावर ईडीनं टाकलेल्या छाप्याबाबत त्यांना विचारण्यात आले. तेव्हा फडणवीस म्हणाले, एखाद्यानं चूक केली नसेल तर त्याला ईडीच्या छाप्याला घाबरण्यांचं काही कारण नाही. चूक झाली असेल तर कारवाई होईलच. या संपूर्ण घडामोडींची माहिती माझ्याकडं नाही. त्यामुळं मी त्यावर फारसं काही बोलणार नाही. मात्र, माझ्या माहितीनुसार, ईडी कुणावरही पुराव्याशिवाय छापा टाकत नाही. त्यांनी तशी कारवाई केली असेल तर नक्कीच त्यांच्याकडे काही तक्रारी किंवा मटेरियल असेल.