हिंदू मंदिरे उघडण्याकरिता शिवसेना नेत्यानं CM उध्दव ठाकरेंना लिहीलं पत्र

पोलीसनामा ऑनलाईन : सुप्रीम कोर्टानं सध्या सुरू असलेल्या पर्यूषण पर्व काळात जैन मंदिरे उघडण्याची सशर्त परवानगी दिली आहे. याशिवाय कोरोनापासून काळजी घेण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी व केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करू अशी हमी या मंदिरांनी द्यावी असे आदेशही मंदिरांना सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. आता शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं आहे आणि सर्व हिंदू मंदिरे व इथर प्रार्थना स्थळं खुली करण्याबाबत मागणी केली आहे.

काय आहे प्रताप सरनाईक यांची मागणी?

“राज्य सरकार अनलॉकच्या दिशेनं वाटचाल करत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरेदेखील उघडावीत अशी मागणी भाविकांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे. सुप्रीम कोर्टानं जर जैन मंदिरे उघडण्यास परवानगी दिली असेल तर राज्यातील हिंदू धर्मीयांची मंदिरे व इतर धर्मीयांची प्रार्थना स्थळे उघडण्याबाबत राज्य सरकारनं निर्णय घ्यायलाच हवा.

उद्यापासून श्री गणेशोत्सव सुरू होत आहे. यानंतर नवरात्र उत्सव सुरू होईल. हिंदू धर्मियांचे हे सर्वात मोठे उत्सव आहेत. सर्वच धर्मांचे भाविक आपापली प्रार्थना स्थळे खुली करण्याची मागणी सरकारकडे करत आहेत. सुप्रीम कोर्टानं जे आदेश दिले आहेत त्याचा अभ्यास करून आपण पुढील निर्णयांबाबत विचार करावा.

गेल्या 5-6 महिन्यात नागरिकांना सामाजिक अंतर कसे ठेवायचे व स्वत:ची काळजी कशी घ्यावी हे समजलं आहे. त्यामुळं राज्य सरकारनं जी नियमावली दिली आहे त्या नियमांचं पालन करण्याची हमी घेऊन, जैन मंदिरांप्रमाणेच सर्व धर्मीय प्रार्थनास्थळं उघडण्यास राज्यात परवानगी द्यायला हवी असं मला वाटतं. राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून आपण हा निर्णय त्वरीत घ्याल याची मला खात्री आहे.” अशी इच्छा सरनाईक यांनी केली आहे.