खळबळजनक ! इंदूरमध्ये शिवसेना नेत्याचा गोळ्या झाडून खून

इंदूर : वृत्तसंस्था –    मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये बुधवारी पहाटे एका शिवसेनेचे नेते आणि ढाबा मालकाचा गोळ्या झाडून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण इंदूर शहरामध्ये खळबळ उडाली असून हा खून नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आला हे समजू शकले नाही. रमेश साहू असे खून करण्यात आलेल्या शिवसेना नेत्याचे नाव असून ही घटना इंदूरच्या तेजाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरीखेडा येथे घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

इंदूरच्या उमरीखेडा येथील ढाब्याचे मालक आणि शिवसेनेचे नेते रमेश साहू यांचा बुधवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास गोळ्या झाडून खून करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. साहू हे शिवसेनेचे मध्य प्रदेशातील प्रमुख होते. ढाब्यारच त्यांचा खून करण्यात आला आहे. या घटनेबाबात सर्वप्रथम कर्मचाऱ्यांना समजले. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून दिला. पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, नेमका कोणत्या कारणामुळे खून करण्यात आला हे तपासात समोर येईल, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या फुटेजची पाहणी केली. तसेच ढाब्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे पोलीस चौकशी करत आहेत. पोलिसांनी तपास सुरु केला असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असे सांगण्यात येत आहे.