संजय राऊत यांनी भाजपवर साधला निशाणा; म्हणाले – ‘आणीबाणीच्या नावाने तुम्ही आजही का दळण दळताय ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आणीबाणी घोषित करणे इंदिरा गांधी यांची चूक होती. मात्र, त्याचा पक्ष म्हणून काँग्रेसने कधीही फायदा करून घेतला नाही. आणीबाणीचा काळ आणि आताची परिस्थिती भिन्न आहे. काँग्रेस पक्षाने स्वतंत्र संस्थांचा कधीही गैरवापर केला नाही, असा दावा इंदिरा गांधींचे नातू, कॉंग्रेस नेते आणि राहुल गांधी यांनी केला होता. राहुल गांधींच्या या विधानावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनामधून भाजपवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी हे सरळ आणि मोकळ्या मनाचे आहेत. आणीबाणीवर ते सहज बोलून गेले; पण भाजपचे लोक आणीबाणीच्या नावाने आजही दळण दळत आहेत, याचे आश्चर्य वाटत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1975 साली एका विशिष्ट परिस्थितीत देशावर आणीबाणी लादली. त्यास एक कालखंड उलटून गेला. ज्यांचा आणीबाणीशी कधीच संबंध आला नाही अशी पिढी राजकारणात आहे. त्या कालखंडाचा साधा चरोटाही अंगावर उठला नाही असे लोक केंद्रीय मंत्रिमंडळात आणि राज्याराज्यांत सत्तेवर असून, ते आणीबाणीच्या नावाने दळण दळत आहेत. आज देशाची परिस्थिती आणीबाणी बरी होती असे म्हणावे अशीच आहे. तापसी पन्नू, अनुराग कश्यपसह चौघांवर आयकर विभागाने छापे मारले. हे चौघे सातत्याने देशातील सद्यःस्थितीवर खुलेपणाने बोलतात. आता या चौघांवर इन्कम टॅक्सच्या धाडी टाकल्या म्हणजे चित्रपटसृष्टीतील चौघे सोडून बाकी सगळे साव आहेत, असंदेखील राऊत यांनी म्हटले आहे.

वॉशिंग्टन पोस्टने मोदी राजवटीतील अघोषित आणीबाणीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. दिशा रवी या फक्त 22 वर्षांच्या पर्यावरणवादी कार्यकर्तीस सरकारने देशद्रोहाच्या आरोपाखाली सरळ तुरुंगात टाकले. शेतकरी आंदोलनास पाठिंबा देणाऱ्या व्यक्तीशी तिचे संबंध जोडून ही कारवाई मोदी प्रशासनाने केल्याचे वॉशिंग्टन पोस्टमध्ये म्हटले आहे. 22 वर्षांच्या मुलीस मोदी प्रशासनाने इतके का घाबरावे, जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीस हे शोभते का, अशा घटनांमुळे लोकशाही शासन व्यवस्थेचा पायाच खचून जात असल्याचे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे.

आणीबाणीचा विषय आता कालबाह्य झाला आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणीत निरपराध लोकांना जो त्रास झाला. कुटुंब नियोजनाच्या मोहिमेत लोकांना जो जुलूम सहन करावा लागला, त्याबद्दल खेद व्यक्त केला आणि पुन्हा आणीबाणी आणणार नाही असे वचनही दिले होते. पण तरीसुद्धा त्यांनी अंतर्गत आणीबाणी जाहीर केल्याची चूक केली, असा पश्चात्ताप मुळीच केला नाही. देशाला अराजकतेपासून वाचविण्यासाठी त्यावेळी आणीबाणी जाहीर करण्यावाचून गत्यंतर नव्हते या भूमिकेवर त्या ठाम राहिल्या होत्या.

आणीबाणी म्हणजे लोकशाही रुळावरून घसरली असे तिचे वर्णन खुद्द इंदिरा गांधींनीच केले होते. इंदिरा गांधी यांच्या पाठीशी प्रचंड बहुमत असूनही देशात राजकीय अस्थिरता वाढू लागली. त्यातून आणीबाणीचा भस्मासुर उदयास आला, पण पुन्हा आणीबाणी आणणार नाही, या इंदिराजींच्या आश्वासनावर जनतेने विश्वास ठेवला व फक्त 3 वर्षांत पुन्हा त्यांना सत्तेवर आणले. म्हणजे जनतेने त्यांना माफच केले. मग राहुल गांधी यांना आजीच्या निर्णयाबद्दल माफी मागायचे कारण काय? आणीबाणी हा विषय कालबाह्य झाला आहे. तो कायमचाच जमिनीखाली गाडला पाहिजे, असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.