अक्षय कुमार कदाचित CM योगी यांना आंब्याच्या पेट्या घेऊन भेटला असेल : संजय राऊत

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   प्रस्तावित फिल्म सिटी मार्गी लावण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. आपल्या या दौऱ्यात योगी राज्यातील गुंतवणूक वाढावी यासाठी विविध उद्योजक, औद्यागिक कंपन्यांचे प्रतिनिधी, सिने तारेतारकांच्या भेटी घेणार आहेत. योगी आदित्यनाथ विशेष विमानाने मंगळवारी सायंकाळी मुंबईत दाखल झाले. उत्तर प्रदेशमध्ये उद्योजकांनी गुंतवणूक करावी आणि तेथे रोजगारनिर्मिती व्हावी यासाठी योगी आदित्यनाथ जोरदार प्रयत्न करीत आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मंगळवारी रात्री दोन दिवसीय मुंबईच्या दौऱ्यावर आले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार याची भेट घेतली. दरम्यान, उत्तर प्रदेशातही फिल्म सिटी तयार करणार असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं होतं. योगी आदित्यनाथ आणि अक्षय कुमार यांच्या भेटीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी टीका केली.

दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईतील फिल्मसिटी उत्तर प्रदेशला हलविणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांनी तेथे फिल्मसिटी उभारण्याच्या कामांना गती ही दिली. मात्र, योगी आदित्यनाथ यांच्या भूमिकेवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. देशात फिल्मसिटी काय फक्त मुंबईतच आहे का? तामिळनाडूतही फिल्मसिटी आहे तिकडेही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जाणार आहेत का? की त्यांनी केवळ मुंबईशीच पंगा घेतलाय? असा प्रश्न संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांना विचारला आहे

खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर साधला निशाणा म्हणाले…

मला माहित नाही योगी आदित्यनाथ मुंबईत आले आहेत. मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ते बसले आहेत त्यांच्यासोबत अक्षय कुमार देखील बसल्याचं मी पाहिलं. कदाचित ते अक्षय कुमार आंब्याची टोपली घेऊन गेले असतील. मुंबईतील फिल्म सिटी कोणी इकडून नेण्याची गोष्ट करत असेल तर तो विनोद आहे. ते इतकं सोप्प नाही. त्याला एक इतिहास आहे. योगी आदित्यनाथांना मी एवढंच विचारू इच्छितो तुम्ही कोणताही मोठा प्रकल्प तयार करू इच्छित तर करा. परंतु नॉएडामध्ये जी फिल्म सिटी तयार केलेली त्याची आज काय परिस्थिती आहे. त्या ठिकाणी किती चित्रपटांचं चित्रीकरण होतं? हे पण जरा मुंबईत येऊन त्यांनी सांगावं.

ठाकरेंना आव्हान देणं योगींना जमणार नाही

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबई दौऱ्यावेळी काही बॉलीवूड कलाकार दिग्दर्शकांशी देखील संवाद साधणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांना हे आव्हान तर नाही ना असा सवाल विचारला गेला. त्यावेळी बोलताना ठाकरेंना आव्हान देणं योगी आदित्यनाथ त्यांना जमणार नाही. शिवाय मुंबई आणि फिल्म इंडस्ट्रीचं एक वेगळं नातं आहे, त्यामुळे मुंबईचे महत्त्व कमी नसल्याचं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.