कुणी सांगितलं दसरा मेळावा ऑनलाइन होणार ? उध्दव ठाकरेंचं भाषण व्यासपीठावरूनच : संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा ऑनलाइन होणार असल्याची चर्चा सुरु आहे. पण चर्चेला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पूर्णविराम दिला आहे. दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्या या मेळाव्याला महत्त्व आहे. त्यामुळे यंदाचा शिवसेनेचा मेळावा ऑनलाइन नाही तर दणक्यात साजरा करणार असल्याचे संकेत खासदार राऊत यांनी दिले.

एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना राऊत यांनी दसऱ्या मेळाव्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असले तरी ते पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे त्यांचं भाषण हे व्यासपीठावरूनच होईल. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळ्या गोष्टी ऑनलाइन होत आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमध्ये 12 सभा घेणार आहेत. त्या कशाप्रकारे सभा घेतात त्याचा आम्ही अभ्यास कर. नियम वैगरे आहेतच. सरकारने काही नियम केले आहेत. कोणत्याही नियमांचं उल्लंघन होणार नाही, असं सांगतानाच दसरा मेळाव्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. येत्या एक-दोन दिवसात त्यावर निर्णय होईल.यंदा प्रथमच ठाकरे मुख्यमंत्री आहेत. बऱ्याच वर्षानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून दसरा मेळाव्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असं राऊत म्हणाले.

अभिनेत्री कंगना रनौतवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. त्याबाबत विचारले असता राऊत यांनी या प्रश्नावर भाष्य करणे टाळले. तसेच ईडीकडून पुन्हा एकदा सिंचन घोटाळ्याची चौकशी होणार आहे. त्याविषयावरही त्यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला. याबाबत सरकारच उत्तर देईल. मी भाष्य करणं योग्य होणार नाही. या घोटाळ्याप्रकरणी राज्याच्या तपास यंत्रणांनी क्लिनचीट दिलेली आहे. एवढंच मला माहीत असल्याचे ते म्हणाले.