अडीच नव्हे तर ‘एवढ्या’ वर्षांसाठी असेल शिवसेनेचा मुख्यमंत्री, संजय राऊतांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पुढील अडीच नव्हे 5 वर्षे राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल. या निर्णयावर तिन्ही प्रमुख पक्षांची चर्चा झाली असून त्यांनी सहमतीही दर्शवली आहे अशी माहिती शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्रीपदावरून भाजप व शिवसेनेत तणाव निर्माण झाला आहे. राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा सुरु आहेत. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला मिळालेल्या जागांमध्ये फारसा फरक नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीकडून अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी करण्यात येत असल्याची चर्चा आहे.

या विषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘महाराष्ट्रात सत्तास्थापनेबाबत येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय होईल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी शिवसैनिक विराजमान होणार आहे. एवढेच नाही तर पुढील पाच वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल. महाराष्ट्राला लवकरच कणखर नेतृत्त्व मिळणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे नेतृत्त्व करावे, ही जनतेची इच्छा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीच राज्याचे नेतृत्त्व करावे, याबाबत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षात एकमत झाले आहे. ‘

भाजपला दूर ठेवून राज्यात सत्ता स्थापन करण्यावर शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये एकमत झालं आहे. काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे. काँग्रेस थेट शिवसेनाला पाठिंबा देणार नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंब्याचे पत्र देणार आहे. सत्तेचा नवा फॉर्म्युला आता तयार झाला असून 11-11-11 या सूत्रानुसार सत्तेचं वाटप होणार आहे. तिन्ही पक्षाच्या सत्तावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला असून नवी आघाडी लवकरच सरकार स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे.

Visit : Policenama.com