SSR Death Case : संजय राऊत यांनी माफी मागावी, अन्यथा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला आता दोन महिने झाले आहेत. तरीही मुंबई पोलिसांचा तपास सुरूच आहे. आता सीबीआयने याप्रकरणी तपास सुरू केलाय. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. त्यामुळे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील आता यात उडी घेतली होती. सुशांतचे त्याच्या वडिलांसोबत चांगले संबंध नव्हते, असे विधान खासदार संजय राऊत यांनी केले होते.

खासदार संजय राऊत यांच्या या विधानानंतर त्यांनी माफी मागितली नाही, तर मानहानीचा दावा ठोकणार आहे, असा इशारा सुशांत सिंह रजपूतचा चुलतभाऊ आणि भाजप आमदार नीरज सिंह बबलू यांनी इशारा दिलाय. त्यामुळे खासदार संजय राऊत सुशांतच्या कुटुंबाबाबत केलेल्या विधानामुळे माफी मागणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

साक्षीदारांना धमकावले जातेय. मुंबई पोलिस त्यांना संरक्षणही देत नाही. ज्या प्रकारे गोष्टी उलगडत आहेत, त्या पाहता साक्षीदारांना जीवे मारले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. साक्षीदारांना पोलिस संरक्षण द्यावे, अशी आमची मागणी आहे, असे नीरज सिंह बबलू यांनी सांगितले आहे.

चूकीचं असेल तर मी माफी मागायला तयार – खासदार संजय राऊत

मला अभिनेता सुशांत सिंह रजपूतच्या कुटुंबीयांची काय मागणी आहे ते माहिती नाही. मी संवेदनशील व्यक्ती असून मला जर वाटलं की आमची काही चूक झाली, तर मी माफी मागेन. मी माझ्या माहितीच्या आधारे बोललोय. त्यांचं कुटुंब त्यांच्या माहितीच्या आधारे बिहार राज्यामधून आरोप करत आहे, अशी तयारी संजय राऊत यांनी अगोदरच दर्शवली होती.

काय म्हणाले होते खासदार संजय राऊत?

मुंबई पोलिसांनी हा तपास नको तितका जास्त खेचलाय. सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींना दररोज चौकशीला बोलवायचे आणि ’गॉसिप’ला वाव द्यायचा. या प्रकरणाचा वापर सिनेसृष्टीत दहशत निर्माण करण्यासाठी झाला काय ते पाहायला हवे?, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले होते. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे वेगळे का झाले? याचा तपास का झाला नाही? मुंबई पोलिसांनी याचा तपास नको तितका का खेचला? हे प्रकरण हायप्रोफाईल होत आहे, असे दिसताच पोलिसांनी माध्यमांना त्याबाबत दिवसाआड माहिती का दिली नाही?, असा सवाल करत खासदार संजय राऊत यांनी मुंबई पोलिसांना देखील धारेवर धरले होते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बिहार सरकारला मध्ये पडायचे कारण नव्हते. सुशांत सिंह रजपूतचे कुटुंब म्हणजे वडील पाटणा येथे राहतात. त्याच्या वडिलांशी सुशांतचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांत सिंह रजपूतला मान्य नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरले नाही. याच वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एक ’एफआयआर’ दाखल करायला लावला. तसेच मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलीस मुंबई येथे आले. याचे समर्थन होऊ शकत नाही.

बिहार राज्याचे पोलीस म्हणजे ’इंटरपोल’ नव्हे. एका गुन्ह्याचा तपास मुंबई पोलीस करीत असून त्याचवेळी दुसर्‍या राज्याचा काही संबंध नसताना त्यांनी समांतर तपास सुरू करावा. हा मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अविश्वास आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी बिहार पोलिसांवर निशाणा साधला होता.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या अगोदर त्याची मॅनेजर दिशा सॅलियन हिने आत्महत्या केली होती. दोन्ही प्रकरणे संपूर्ण वेगळी आहेत. पण, राजकीय नेते दोन आत्महत्यांचा धागा जुळवत असून दिशा सॅलियन हिच्यावर बलात्कार करून तिला इमारतीवरून फेकले, असा आरोप भाजपचे एक नेते करतात, तेव्हा त्यांनी तिच्या कुटुंबीयांचा थोडाही विचार केलेला आढळत नाही. दिशा सॅलियनच्या वडिलांनी एक पत्र लिहून याबाबत खंत व्यक्त केलीय.

मृत्यूनंतर माझ्या मुलीची आणि आमच्या कुटुंबीयांची बदनामी का करता?, हा तिच्या माता-पित्यांचा सरळ प्रश्न आहे. दिशा सॅलियन हिचे संपूर्ण कुटुंब या बदनामीमुळे मानसिकदृष्टया खचले असून तिचे वडील डिप्रेशनमध्ये गेलेत, असे आता समोर आले आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले होते.