Lockdown वरून संजय राऊतांचा काँग्रेसला टोला, म्हणाले – ‘काय विरोध हे माहित नाही, तो त्यांचा अंतर्गत विषय असू शकतो’

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. दरम्यान राज्यातील लॉकडाऊनला ठाकरे सरकारमध्ये सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसने विरोध केला आहे. यावरून शिवसेनेचे नेते राऊत यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. काँग्रेसचा काय विरोध आहे हे माहिती नाही. इतर विषयांप्रमाणे हादेखील त्यांचा अंतर्गत विषय असू शकतो, असे म्हणत राऊतांनी लॉकडाऊनवरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. लॉकडाऊन व्हाव किंवा नाही हा राष्ट्रीय प्रश्न आहे. याचा निर्णय मुख्यमंत्री घेऊ शकतात. मुख्यमंत्री फार आनंदाने असा प्रकारचे निर्णय घेतात, असे नाही. आपत्कालिन परिस्थितीनुसार असे निर्णय मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांना घ्यावे लागतात, असे राऊत यावेळी म्हणाले.

खासदार संजय राऊत यांनी रविवारी (दि. 4) प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना यावर भाष्यं केले आहे. केंद्राने सर्व राज्यांना मदत करणे गरजेचं आहे. विशेषत: महाराष्ट्राला मदत करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र कोलमडला तर देश कोलमडेल. पण फक्त महाराष्ट्रात भाजपच राज्य नाही म्हणून त्यांची कोंडी करायची हे राष्ट्रीय एकात्मतेला आणि संसदीय लोकशाहीला धरून नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. त्याचे कारण म्हणजे आपल्याकडे चाचण्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. इतर राज्यात तसे नाही. महाराष्ट्राचं कौतुक करायला हवे, यातून महाराष्ट्र लवकर बाहेर पडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रत्येकाचे काही वैयक्तिक मत असू शकते. परंतू एक राज्य आणि एक देश म्हणून मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना काही निर्णय घेणे बंधनकारक असते. ते राज्याच्या आणि देशाच्या सुरक्षेसाठी असते असे राऊत म्हणाले.