‘धनंजय मुंडेंचा ‘तो’ वैयक्तिक प्रश्न, ठाकरे सरकारला धोका नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. यानंतर एकच राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान मुंडे यांच्यावर झालेल्या आरोप हा वैयक्तिक आहे. तो त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत येणार नसल्याचा दावा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंडे यांच्यावरील आरोप हा राजकारणाचा मुद्दा नसल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे अनुभवी नेते आहेत. मुंडे यांच्याबाबत ते योग्य निर्णय घेतील असेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी भाजपबाबतही भाष्य केले. राजकारणात कोणीच कायमचे शत्रू किंवा मित्र नसतात. आम्ही भाजपबरोबर 25 वर्षे एकत्रित काम केलेले आहे. आम्ही त्यांना विरोधक मानतच नाही. त्यांनी नेहमी गोड राहावे, गोड बोलावे आणि महाराष्ट्रालाही गोड दिवस यावेत, असे म्हणत भाजपला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. कृषी कायद्याबाबत बोलताना खा. राऊत म्हणाले, की, केंद्र सरकारकडे पाशवी बहुमत आहे. उलट कायदा मागे घेतल्याने त्यांची प्रतिमा उजळेल. हा माघार घेण्याचा प्रश्न नाही. त्यांनी समन्वय साधावा, तडजोड करावी. याचा केंद्र सरकारलाच फायदा होईल.

शिवसेनेच्या नेत्यांवर केंद्रीय तपास संस्थांकडून होत असलेल्या कारवाईबाबत खासदार राऊत म्हणाले की, जेव्हा केंद्रात आणि राज्यात वेगवेगळ्या पक्षाचे सरकार असते. तेव्हा असे प्रसंग घडतच असतात. यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. पश्चिम बंगालमध्येही तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्यावर अशीच कारवाई झाल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले.