संजय राऊतांचा विरोधकांना टोला; म्हणाले – ‘महाविकास आघाडी संकटाला संधी मानून राजकारण करत नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकीकडे कोरोनाने थैमान घातलं आहे तर दुसरीकडे राजकारणात आरोप प्रत्यारोपातुन ताशेरे ओढले जात आहेत. यावरून शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकाना टोला लगावला आहे. आता सगळेजण कोरोना संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला साथ द्या. राजकारण करू नका, संकट ही संधी मानून महाविकास आघाडी राजकारण करत नाही. असा निशाणा देखील राऊत यांनी विरोधकांना केला आहे. यावेळी राऊत हे माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले संजय राऊत ?

सर्वांनी एकत्रं येऊन काम करावं. तरच संकटाला तोंड देता येईल. सध्याच्या काळात राजकारण करणं योग्य नाही. राजकारण करण्याची आपली परंपरा नाही आणि सध्याच्या वातावरणात राजकारण करणंही योग्य नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. पुढे राऊत यांनी मोफत लसीकरणाबाबत बोलताना म्हणाले, हा सरकारचा विषय आहे. जनतेच्या हिताचा निर्णय सरकार घेईल. कोणत्याही राजकारणाशिवाय हा निर्णय घेतला जाईल, कोरोनाच्या संकटातून राज्याला बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मजबुतीनं काम करत आहेत. विरोधकांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करावं. रुग्णांचा जीव वाचवणं हे आपलं प्राधान्य आहे.

केंद्राने मंजूर करून आणि निधी देऊनही राज्यात ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले नाहीत, या विरोधकांच्या आरोपांचं त्यांनी खंडन करत म्हटले की, राज्यात (महाराष्ट्र) ऑक्सिजनशिवाय कुणाचाही बळी गेला नाही. उत्तर प्रदेशात, दिल्लीत ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यामुळे ऑक्सिजन प्लांटचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. अशाप्रकारचे घाणेरडे आरोप विरोधकांनी करू नये.

मी उत्तर प्रदेश, बिहार आणि दिल्लीची महाराष्ट्राशी तुलना करत नाही. मात्र या राज्यांमध्ये जाऊन बघा त्यांच्या तुलनेत महाराष्ट्र निश्चितच चांगलं काम करत आहे. या दरम्यान. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी CBI ने मारलेल्या छाप्यांबाबत बोलताना म्हणाले, अशा प्रकारच्या छापेमारी मागे राजकीय षडयंत्र असेल तर आघाडीतील तिन्ही पक्ष त्याचा एकत्रितपणे सामना करतील असे राऊत यांनी त्यावेळी म्हटले आहे.