संजय राऊतांनी कंगनाला दिलं ठासून उत्तर, म्हणाले – ‘मुंबई मराठी माणसाच्या बापाची, महाराष्ट्रातील शत्रूंचा करणार खात्मा’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : शिवसेना नेते संजय राऊत आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. मुंबईबद्दल कंगना राणौत यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी जोरदार हल्ला केला. ते म्हणाले की मुंबई मराठी माणसाच्या बापाची आहे. तसेच ते म्हणाले महाराष्ट्रातील अशा शत्रूंचा खात्मा केल्याशिवाय शिवसेना थांबणार नाही.

वास्तविक, कंगना रणौत शुक्रवारी म्हणाल्या की 9 सप्टेंबरला त्या मुंबईत पोहोचणार आहेत, कोणाच्या बापात हिम्मत असेल तर थांबवावे. कंगनाच्या याच विधानाला उत्तर देताना संजय राऊत यांनी ट्विट केले की मुंबई मराठी माणसाच्या बापाची आहे. ज्यांना हे मान्य नाही, त्यांनी सांगावं त्यांचा बाप कोण आहे. संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील अशा शत्रूंचा खात्मा केल्याशिवाय शिवसेना थांबणार नाही. संजय राऊत या ओळीसोबतच ‘प्रॉमिस’ असेही लिहितात.

कंगनाने काय म्हटले होते

यापूर्वी कंगना रणौत यांनी ट्विट केले होते की मला बरेच लोक मुंबईत परत येऊ नये अशी धमकी देत आहेत, म्हणून मी 9 सप्टेंबरला मुंबईत येईन असा निर्णय घेतला आहे. मी मुंबई विमानतळावर पोहोचून टाइम पोस्ट करेन, जर कुणाच्या बापात हिम्मत असेल तर अडवून दाखवावे. त्याचवेळी, राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनीही कंगना आणि संजय राऊत यांच्यात झालेल्या वादात उडी घेतली आहे. मुंबईची तुलना पीओकेशी केल्याबद्दल कंगनावर देशद्रोहाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करावा, असे मनसेने सांगितले.

शिवसेना नेते अनिल परब यांनीही कंगना रणौत यांच्यावर हल्ला केला आहे. ते म्हणाले की सुशांत प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआय मुंबईत आली होती, कंगनाने आतापर्यंत तपास यंत्रणेला कोणतीही माहिती दिली नाही. ती फक्त ट्विट करत आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्याला समर्थन देत ते म्हणाले की जे बोलले ते योग्यच बोलले.

मुंबईबाबत केले होते वक्तव्य

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघडपणे धमकी दिली असून मुंबईत परत न येण्यास सांगितले, असे सांगत कंगना राणौत यांनी गुरुवारी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले होते. प्रथम मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याचे नारे देण्यात आले आणि आता उघड धमकी दिली जात आहे. अखेर मुंबई पीओके सारखे का वाटत आहे? कंगना म्हणाल्या होत्या की त्यांना फिल्म माफियांपेक्षा शहर पोलिसांची जास्त भीती वाटते.