मंत्रिपद नं दिल्यानं सुनील राऊत नाराज आहेत का ? संजय राऊतांनी दिलं ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. आज दुपारी हा सोहळा पार पडला. महाविकासआघाडीच्या एकूण 35 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. सजंय राऊत यांनी महाविकासआघाडीचे सरकार स्थापन करण्यात आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. परंतु संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. यामुळे सुनील राऊत नाराज असल्याचं बोललं जात आहे. अशातच संजय राऊतांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “हे एक चांगलं आणि अनुभवी मंत्रिमंडळ आहे. हे मंत्रिमंडळ चांगलं काम करून राज्याला दिशा देईल. सुनील राऊतांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं आमच्या घरात कोणीही नाराज नाही. सरकार स्थापन करण्यात आम्हाला महत्त्वाची भूमिका निभवता आली यातच आम्हाला समाधान आहे.” असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं.

दरम्यान शिवसेनेच्या ज्या आमदारांची मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागली आहे त्यात आदित्य ठाकरे, अनिल परब, गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार, संजय राठोड, दादा भुसे, संदीपान भुमरे, उदय सामंत, शंकरराव गडाख, शंभूराज देसाई, बच्चू कडू, राजेंद्र येड्रावकर या आमदारांचा समावेश आहे.

मुंबईतील विधानभवनाच्या प्रांगणात आज दुपारी एक वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्व नव्या मंत्र्यांना शपथ दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी रात्री उशीरा मंत्र्यांच्या नावाची यादी राजभवनावर पाठवली होती. यानंतर आज शपथविधी पार पडला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/