अहमदनगर : माजी महापौरांविरुद्ध राजकीय सूडबुद्धीने खोटा गुन्हा, शिवसेनेचा पोलिस ठाण्यावर मोर्चा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्याविरुद्ध राजकीय सूडबुद्धीने खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने कोतवाली पोलिस ठाण्यावर आज दुपारी मोर्चा काढण्यात आला होता.

या मोर्चात शिवसेना उपनेते माजी मंत्री अनिल राठोड, शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक योगीराज गाडे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्याशी चर्चा केली. पाटील यांनी चौकशी करूनच कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी पोलिस उपअधीक्षक अजित पाटील, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ आदी उपस्थित होते.

शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्यावतीने नेता सुभाष चौक येथून कोतवाली पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शिवसेनेचे शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कोतवाली पोलिस ठाण्यात आल्यानंतर आंदोलकांनी अप्पर पोलीस अधीक्षक पाटील यांना निवेदन देऊन चर्चा केली. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्यावेळी गुन्हा घडला, त्यावेळी फुलसौंदर हे घरी होते. याचे सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध आहे. त्यांचा गुन्ह्याशी कसलाही संबंध नसताना विनाकारण त्यांचे नाव गोवण्यात आले आहे.

राजकीय जीवनात अडथळा निर्माण करण्यासाठी खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी व जमीन बळकावण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. पोलीस अधिकार्‍यांनी आंदोलकांशी चर्चा केली. सर्व कायदेशीर बाबी तपासून पाहिले जातील व सर्व बाबी तपासल्यानंतरच योग्य ती कारवाई केली जाईल, असे पाटील यांनी सांगितले. त्यानंतर शिवसेनेने मोर्चा मागे घेतला.

आरोग्यविषयक वृत्त-

Loading...
You might also like