नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला अपघात, अंगठ्याला किरकोळ दुखापत

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ( Urban Development Minister Eknath Shinde) यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातातून शिंदे बचावले असून त्यांच्या अंगठ्याला किरकोळ दुखापत झाल्याचे समजते. मात्र, अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

नवी मुंबई येथील कार्यक्रम संपवून गुरुवारी (दि. 24) नगरविकास मंत्री शिंदे वाशीमार्गे मुंबईला जात होते. दरम्यान वाशी टोलनाक्यावर शिंदे यांच्या टोयटा एसयुव्ही गाडीला अपघात झाला. अपघातात गाडीच्या समोरच्या भागाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातातून शिंदे बचावले असून त्यांच्या अंगठ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. शिंदे यांची प्रकृती उत्तम असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पालघरमधील विक्रमगड तालुक्यातील व जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथील एका घरात तांदळामध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवून अलौकिक शक्तीची कृपा मिळविण्याचे हेतूने शिंदे यांच्या जीवाला धोका व्हावा अथवा त्यांच्या शरीराला जीवघेण्या जखमा होवून दुखापत करण्याकरिता अनिष्ठ अघोरी प्रथांचा वापर करण्यात आला होता. शिंदे यांच्या फोटोसमोर अगरबत्ती पेटवून हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू, सफेद कोंबडा यांचा वापर करून अघोरी जादूटोणा करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हा शाखेने अटक केली. पण एखादे मोठे षढयंत्र आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत.