संजय राठोड राजीनामा देणार ? संजय राऊतांचे सूचक ट्विट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले वनमंत्री संजय राठोड यांना मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरु आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पूजा चव्हाण प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे संजय राठोड आज राजीनामा देण्याची शक्यता असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबद्दल सूचक ट्विट केले आहे.

राज्य सरकारच्या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मात्र, अधिवेशनात सरकारची प्रतिमा मलिन होऊ नये, विरोधकांनी या मुद्यावरून सरकारला घेरु नये यासाठी संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याची शक्यता आहे. आज चहापानापूर्वी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर चर्चा होणार आहे. पण शिवसेनेच्या काही मंत्री आणि आमदारांनी राठोड यांची पाठराखण केली आहे.

तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक फोटो ट्विट केला असून संजय राठोड यांच्यावर कारवाई होणार असल्याचे संकेत दिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हातात राजदंड असलेला फोटो राऊत यांनी ट्विट केला आहे. शिवरायांच्या हातातला हा राजदंड काय सांगतो ? महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन, असा मजकूर या फोटोवर लिहलेला आहे. यामुळे संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या चर्चेला उधाण आले आहे.