मोठी बातमी ! कोकणात वाढत्या ‘कोरोनाबाधित’ रुग्णसंख्येवर ‘या’ शिवसेना मंत्र्यांनी केला ‘धक्कादायक’ खुलासा

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याचे उच्च, तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिवसेंदिवस वाढत चालणाऱ्या कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. ते म्हणाले की मुंबईकरांना तहसिलदारांनी थेट गावात सोडल्यामुळेच रत्नागिरीसह कोकणच्या अनेक भागांत कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तसेच त्यांचे म्हणणे आहे की ज्या नागरिकांच्या स्वॅब टेस्ट करण्यात आल्या होत्या त्या नागरिकांना त्यांचा रिपोर्ट येण्याआधीच तहसीलदारांनी गावात सोडले. कोकणात मंडणगड, दापोली आणि संगमेश्वरमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. येथील तहसीलदारांवर कुणाचे दडपण होते का ? असा प्रश्न देखील उदय सामंत यांनी उपस्थित केला.

दरम्यान विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजप आमदारांच्या कोकण दौऱ्यावरुन शिवसेना-भाजपमध्ये चांगलेच युद्ध पेटले आहे. शिवसेनेचे सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आरोप केला की रेड झोनमधून आलेल्या भाजप आमदारांनी कोकणात येण्याआधी स्वत: क्वारंन्टाइन व्हावे अन्यथा कोकणात कोरोना पसरण्याचा धोका अधिक उद्भवू शकतो. यास प्रतिउत्तर देताना दरेकर म्हणाले की राज्यात दौरे करणाऱ्या गृहमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना अगोदर क्वारन्टाइन करा आणि नंतर भाजपाबद्दल बोला असं सामंतांना सुनावलं.

तसेच भाजपाने जाहीर आव्हान केलं की, आम्ही भाजपचे पाच विधानपरिषद आमदार कोकणात कोरोना टेस्ट लॅबकरीता प्रत्येकी वीस लाख रुपये द्यायला तयार आहोत. पण तुम्ही लॅब सुरु करुन दाखवा, असे म्हणत त्यांनी कोकणातील आरोग्य सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच दरेकरांनी स्पष्ट केले की जे मुंबईकर सध्याला कोकणात आले आहेत त्यांना क्वारन्टाइन करण्यात आलेल्या ठिकाणी प्रशासनाकडून पुरेशा सुविधा देखील पुरविल्या जात नाहीत. यामुळे मुंबईकर आणि गावकरी यांच्यात वाद होण्याचे प्रकार समोर येत आहेत. तसेच संकटात सापडलेल्या मुंबईकरांना कोकणात सोडण्यासाठी मोफत एसटी गाड्यांचा बंदोबस्त करायला हवा होता. परंतु कोकणचे सुपुत्र असलेले परिवहन मंत्री अनिल परब यांनी याकडे सपशेल दुर्लक्ष केलं.