….म्हणून शिवसेनेच्या मंत्र्याने नारायण राणेंची केली स्तुती

रत्नागिरी: पोलीसनामा ऑनलाइन – कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. अशावेळी कोरोनाच्या संकट काळात शिवसेना आणि राणे कुटुंब आपसातील शत्रुत्व तूर्त बाजूला सारून एकदिलाने काम करताना दिसत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज रविवारी (दि. 9) रात्री 12 वाजल्यापासून 15 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला असून यानिमित्ताने दिलजमाई दिसून आली आहे.

लॉकडाऊनचा निर्णय घेताना पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांना विश्वासात घेतले. यावेळी माजी मुख्यमंत्री व जिल्ह्यातील भाजप खासदार नारायण राणे यांनी जो पाठिंबा दिला त्याची सामंत यांनी मुक्तकंठाने स्तुती केली. राणे हे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आहेत. मी पालकमंत्री म्हणून काम करताना त्यांचे चांगले सहकार्य मिळत आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी व समूह संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लावावे लागणार आहेत, असे मी त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी तत्काळ असे निर्बंध आवश्यक असल्याचे मला सांगितले. अशा विधायक आणि जनतेच्या हितासाठी घेतल्या जाणाऱ्या निर्णयांत मी नेहमीच आपल्या पाठिशी असल्याचे त्यांनी सांगितल्याचे सामंत यांनी नमूद केले. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातही कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. पुढील दोन दिवसांत पालकमंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा झाल्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे सामंत यांनी नमूद केले आहे.