भास्कर जाधवांची भाजपवर जोरदार टीका, म्हणाले – ‘ज्या झाडावर वाढलात ते झाडच खायला निघालात’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी पत्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर पत्र लिहित अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या लेटरबॉम्बमुळं सध्या सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात चांगलीच खडाजंगी सुरू आहे. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी यावर भाष्य कर, शिवसेनेला या प्रकरणी लक्ष्य करणाऱ्या भाजपवर सडकून टीका केली आहे. ज्या झाडावर तुम्ही वाढलात ते झाडच खायला निघालात. त्यामुळं नियती कोणाला सोडत नसते अशी टीका जाधव यांनी केली आहे.

‘ज्या झाडावर वाढलात ते झाडच खायला निघालात’

भास्कर जाधव म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे संजीवनी होते. या संजीवनीमुळंच भाजप मोठा झाला. भाजपचा मुख्यमंत्री झाला नाही ही त्यांची दुखरी नस आहे आणि ती खदखददेखील आहे. जर महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्षे चाललं नाही तर 2024 मध्ये देशात भाजप सरकार दिसणार नाही हे भाजपला माहिती आहे. बाळासाहेब ठाकरे नावाच्या संजीवनीमुळंच भाजप मोठा झाला. ज्या झाडावर वाढलात ते झाडच खायला निघालात. त्यामुळं नियती मात्र कोणालाच सोडत नाही अशी टीका जाधव यांनी केली आहे.

‘त्यावेळी अमित शाह यांनी राजीनामा दिला होता का ?’

पुढं बोलताना भास्कर जाधव म्हणाले, नैतिकतेचे धडे भाजपनं आम्हाला देऊ नयेत. गुजरात राज्याचे गृहमंत्री असताना अमित शाह यांच्यावर त्यावेळचे पोलीस दलाचे प्रमुख डी जी वंजारी यांनी आरोप केले होते. त्यावेळी अमित शाह यांनी राजीनामा दिला होता का ? मोहन डेलकर यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. त्यात काही नाव आहेत. त्याचं काय झालं ? हे पाहता असं म्हणता येईल की, भाजपला नैतिकतेच्या गोष्टी तोंडातून बोलता येतात परंतु प्रत्यक्षात मात्र भाजपनं नैतिकता कधीही पाळली नाही असंही जाधव म्हणाले.

‘छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील केंद्र सरकार राज्य सरकारच्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करत आहे’

भास्कर जाधव असंही म्हणाले की, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील केंद्र सरकार राज्य सरकारच्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करत आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथकाच अर्थात एटीएसचा तपास पूर्ण होत आला असताना देखील हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे अर्थात एनआयएकडे दिला गेला. यातून हेच स्पष्ट होत असल्याचंही जाधव यांनी सांगितलं.

‘ही तुमची नैतिकता आम्हाला मान्य नाही’

भास्कर जाधव म्हणाले, नैतिकता काय असते हे दाखवण्याचं काम महाविकास आघाडीनं केलं आहे. तुम्ही बोट दाखवायचं आणि त्याला बाहेर काढायचं ही तुमची नैतिकता आम्हाला मान्य नाही असंही जाधव यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.