शिवसेनेच्या आमदाराचा अप्रत्यक्षपणे खडसेंना इशारा, मुक्ताईनगरच्या विकासात अडचणी आणल्यास…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   मागील अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे (eknath khadse) भाजपला (bjp) रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अखेर एकनाथ खडसे यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले. खडसे शुक्रवारी (दि.23) राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत जयंत पाटील (jayant patil) यांनी प्रसारमाध्यांशी संवाद साधताना अधिकृतरीत्या घोषणा केली.

त्यानंतर अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा करत असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या वृत्तावर मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. चांगली गोष्ट आहे. खडसे महाविकास आघाडीच्या कुटुंबात येत असतील तर आनंद आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले. परंतु एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर मुक्ताईनगरचे शिवसेनेचे (Shivsena) आमदार चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी टीका केली आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चंद्रकांत पाटील म्हणाले की, एकनाथ खडसे हे निष्ठावंत नेते नाहीत. पुढे पाहा काय काय होतंय. एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशानंतर मी खासदार शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा मी लाडका आमदार आहे. त्यांच्यामुळे मला काही त्रास होईल असं मला वाटत नाही आणि वाटणारही नाही.

एकनाथ खडसे तुमच्या मतदारसंघात हस्तक्षेप करतील का, या प्रश्नावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, एकनाथ खडसेंचा तो नैसर्गिक स्वभाव आहे. ते कुठेही हस्तक्षेप करु शकतात. मात्र एकनाथ खडसे हा काही विषय माझ्यासाठी महत्त्वाचा नाही. माझ्यासाठी मुक्ताईनगरचा विकास महत्त्वाचा आहे. माझ्या मतदारसंघाचा विकास करताना महाविकास आघाडीत कोणत्याही नेत्यांनी अडचणी आणल्या तर मी वरिष्ठांशी बोलून त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. तसेच असं न झाल्यास मग चंद्रकांत पाटील स्वत:ची स्टाईल जाणतो. त्याप्रमाणे भविष्यातील राजकारण होइल, असा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.